नांदेड शहरात 3 दुकानांवर गोळीबार, घटनेमुळे शहर हादरलं

नांदेड शहरात 3 दुकानांवर गोळीबार, घटनेमुळे शहर हादरलं

गोळीबाराच्या घटनेत एक पान टपरी चालक जखमी झाला. तसंच या घटनेमुळे नांदेड शहर पुन्हा हादरलं आहे.

  • Share this:

नांदेड, 4 ऑक्टोबर : नांदेड शहरातील जुना मोंढा कापड मार्केट परिसरात अज्ञात आरोपीनी 3 दुकानांवर गोळीबार करत काही रक्कम लुटली आहे. गोळीबाराच्या घटनेत एक पान टपरी चालक जखमी झाला. तसंच या घटनेमुळे नांदेड शहर पुन्हा हादरलं आहे.

शहरातील जुना मोंढा भागात असलेल्या महाराजा रणजितसिंह मार्केटमधील विजय धनवानी यांच्या दुकानात दोन दुचाकीवरून आलेले 4 जण घुसले. सुरुवातीला चाकूचा धाक दाखवून एका ग्राहकाजवळील दहा हजार रुपये काढून घेण्यात आले. तसंच आरोपींनी जाताना हवेत बंदुकीच्या दोन गोळ्या झाडल्या.

त्यानंतर आरोपींनी इतर 2 दुकानात शिरून फायरिंग करत पैसे लुटले. पळून जाताना आरोपींनी हवेतही गोळीबार केला. त्यामुळे परिसरात धावपळ उडाली. रस्त्याच्या कडेला असलेल्या पान टपरी चालक आकाश परिहार हा टपरी बंद करून पळत सुटला असता आरोपींनी त्याच्यावरही एक गोळी झाडली.

ही गोळी त्याच्या उजव्या दंडाला चाटून गेली. त्यामुळे तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अवघ्या दहा मिनिटात आरोपींनी सात गोळ्या झाडून घटनास्थळावरून पळ काढला. भरदिवसा गोळीबार करुण आरोपींनी पोलीस खात्याला आव्हान दिलं आहे. त्यामुळे नांदेड पोलीस आगामी काळात कशाप्रकारे गुन्हेगारांचं कंबरडं मोडून काढतात, हे पाहावं लागेल.

Published by: Akshay Shitole
First published: October 4, 2020, 11:46 PM IST

ताज्या बातम्या