लघुउद्योजकाची आत्महत्या.. मृत्यूपूर्वी मुलीला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला 'हा' मेसेज

लघुउद्योजकाची आत्महत्या.. मृत्यूपूर्वी मुलीला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला 'हा' मेसेज

काही महिन्यांपासून थकीत जीएसटी व मंदीमुळे विष्णू काळवणे वैफल्य आले होते

  • Share this:

औरंगाबाद,20 नोव्हेंबर: सिडको वाळूज महानगर-1 मधील साक्षी नगरात लघुउद्योजक विष्णू रामभाऊ काळवणे (वय-53,मूळ रा. फुलशेवरा, ता. गंगापूर) यांनी मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. काळवणे यांचा डब्ल्यू सेक्टरमध्ये भाड्याच्या गाळ्यात श्री गणेश इंडस्ट्रीज या नावाने लघुउद्योग होता. थकलेल्या जीएसटीमुळे विष्णू काळवणे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

काही महिन्यांपासून थकीत जीएसटी व मंदीमुळे विष्णू काळवणे वैफल्य आले होते, त्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. विष्णू काळवणे यांची मुलगी पुण्यात राहते. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपली विवाहित मुलगी रोशनी जाधव हिला व्हॉट‌्सअ‍ॅपवर आपण आत्महत्या करत असल्याबाबत एक मेसेज पाठवला होता. मेसेज वाचताच भेदरलेल्या मुलीने तत्काळ पंढरपूर येथे भावाला कळवले. काळवणे यांच्या पत्नी व मुलाने साक्षीनगरीत असलेल्या खोलीकडे धाव घेतली. मात्र, तोवर खूप उशीर झाला होता.

काय लिहिले आहे सुसाईडनोटमध्ये...

'उद्योगातील मंदीमुळे उत्पादनात 50 टक्के कपात झाली. कामाच्या ऑर्डर कमी मिळतात, मात्र कंपनीतील कुशल कामगारांना पूर्ण वेळ काम नसतानाही पगार द्यावा लागतो. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत आले आहे. तसेच कमी उत्पादनामुळे खर्चाचा भार वाढत असल्याने मागील वर्षभरापासून जीएसटी थकला आहे. जीएसटी अधिकाऱ्यांकडून कर भरण्यासाठी तगादा सुरू आहे. आर्थिक अडचण असल्याने जीएसटी भरण्यासाठी त्यांनी वेळ मागितला, तो मिळाला नाही. या दबावामुळे आत्महत्या करत आहे.', असे विष्णू रामभाऊ काळवणे यांनी आपल्या विवाहित मुलीला व्हॉट‌्सअ‍ॅपवर पाठवलेल्या मेसेजमध्ये उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, जीएसटीमुळे झालेली ही पहिलीच आत्महत्या असावी. विष्णू काळवणे कुटूंबीयांसह 20 वर्षांपूर्वी वाळूजमध्ये आले होते. सुरुवातीला मिळेल ते काम करून नंतर त्यांनी डब्ल्यू-52 सेक्टरमध्ये गणेश इंडस्ट्रीज या बफिंग शॉपला सुरुवात केली. येथे 10 कामगार होते. काही दिवसांपासून मंदीमुळे ते अस्वस्थ होते. त्यातच शासनाकडून जीएसटीचा तगादा व नोटिसीद्वारे शेवटची 27 नोव्हेंबर तारीख देण्यात आल्याने काळवणे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

First Published: Nov 20, 2019 10:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading