'मुख्यमंत्री साहेब.. शिवसेना नव्हे महाविकास आघाडीच्या नावाने प्रसिद्धी द्या'

'मुख्यमंत्री साहेब.. शिवसेना नव्हे महाविकास आघाडीच्या नावाने प्रसिद्धी द्या'

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे.

  • Share this:

जालना,29 डिसेंबर: राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयात 'महाविकास आघाडी'च्या सर्वच पक्षाचा सहभाग आहे. परंतु बॅनर्स आणि जाहिरातींच्या माध्यमातून फक्त शिवसेनेचीच प्रसिद्धी होत असल्याचा आरोप केला जात आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशिक्षण विभागाच्या प्रदेश सरचिटणीस विजय सुरासे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले आहे. 'मुख्यमंत्री साहेब, महाविकास आघाडीच्या नावाखालीच सरकारी योजना,निर्णय आणि योजनांना प्रसिद्धी द्या, असे विजय सुरासे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. या तिन्हीही पक्षांनी एकत्र येत 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' तयार केला. त्यामुळे सरकारचे निर्णय, योजना राबवताना तिन्हीही पक्षांचा समान वाटा आहे. मात्र सरकार घेत असलेल्या निर्णयाची जनतेला बॅनरच्या माध्यमातून जिल्हास्तरावर माहिती देतांना बॅनरवर फक्त शिवसेनेचा उल्लेख दिसून येतोय. त्यामुळे महाविकास आघाडीतील कार्यकर्ते आणि जनता यांच्यात चुकीचा संदेश जाईल. आतापासूनच महाविकास आघाडीतील सर्वच पक्षात श्रेय घेण्यासाठी स्पर्धा लागेल शिवाय संघर्ष पेटेल. त्यामुळे जिल्हास्तरावर सरकारचे निर्णय, योजना यांची माहिती बॅनरद्वारे देताना फक्त शिवसेनेऐवजी महाविकास आघाडीचा उल्लेख करावा, अशी मागणी राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर जालना शहरात शिवसेनेकडून बॅनर लावण्यात आलेत.या बॅनरवर फक्त शिवसेनेचा उल्लेख आहे. या पार्श्वभूमीवर हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिण्यात आले आहे. अपंग असलेल्या सुरासे यांनी स्वतः जालन्यातील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपल्या मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना पोस्ट केले आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या पत्राची कितपत दखल घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2019 10:22 AM IST

ताज्या बातम्या