सुरेश जाधव(प्रतिनिधी)
बीड,1 डिसेंबर: नवरात्रात तुळजाभवानीला साकडं घातले होते की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवू दे.. मी बीडहून तुळजापूरला दंडवत घालत येईल! तुळजाभवानीच्या आशीर्वादानेचे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे नवस फेडण्यासाठी बीडहून दंडवत घालत निघाल्याचे शिवसैनिक ओंकार अरुण पवार याने सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ओंकार तुळजापूरच्या दिशेने निघाला आहे.
बीड शहरातील पिंगळे गल्लीत राहणारा 22 वर्षीय ओंकार अरुण पवार याने निवडणुकीच्या आधी तुळजाभवानीला नवस बोलला होता. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर मी पायी दंडवत घालत येईल, असे साकडं घातलं होतं. तुळजाभवानीने हाक ऐकली यामुळे आता पायी दंडवत घालत निघालो असल्याचे ओंकारने सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांना हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी जसं बळ दिलं तसेच बळ महाराष्ट्राचा विकास सर्वांगिन विकास करण्यासाठी उद्धव ठाकरेंना बळ दे असे मागणेही मागणार असल्याचे ओंकार म्हणाला.
कडाक्याच्या थंडीत, कडक उन्हामध्ये तब्बल 150 किलोमीटर पायी दंडवत घालत हा कट्टर शिवसैनिक बीडहून तुळजापूरच्या दिशेने निघाला आहे. या तरूण शिवसैनिकाचे बीड जिल्ह्यात कौतुक होत आहे. बीड शिवसेनेमधील गटबाजीमुळे या कार्यकर्त्याला बीड जिल्ह्यातील कुठलाच शिवसेना पदाधिकारी अद्याप भेटला देखील नाही, अशीही खंत व्यक्त केली जात आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा