औरंगाबाद, 29 फेब्रुवारी : औरंगाबादमधील भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात नाराजीनाट्य घडलं आहे. या मेळाव्याला भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे अनुपस्थित राहिले. कार्यक्रमस्थळी रावसाहेब दानवे यांचा फोटो लावला नसल्याने दानवे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
रावसाहेब दानवे यांच्या फोटो लावला नसल्याचे मेळाव्याच्या आयोजकांना लक्षात आल्यानंतर चालू कार्यक्रमात रावसाहेब दानवे आणि हरिभाऊ बागडे यांचे फोटो चिटकावण्यात आले. शेवटी बागडे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मात्र रावसाहेब दानवे मात्र गैरहजरच राहिले. त्यामुळे दानवेंची अनुपस्थिती या कार्यक्रमात चर्चेचा विषय झाला आहे.
दरम्यान, औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून भाजपही यामध्ये मागे नाही. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये भाजपचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली.
शिवसेनेवर जोरदार टीका
'औरंगाबाद महापालिका निवडणूक सोपी नाही. फक्त जिंकणार.... हरावणार...भाजप की जय असं म्हटल्याने विजय मिळत नाही. औरंगाबादेची वाट शिवसेनेच्या वतीने लावण्यात आली. रास्ते पाणी आणि कचरा समस्या सोडवता आली नाही. आता महिला रोजगार, आरोग्य केंद्र, महिलांसाठी स्वछता गृह नाहीत. वृद्धांची सोय शहरात नाही,' असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
दरम्यान, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी एक घोषणाही केली. प्रचारासाठी येत्या पाडव्याला 1 लाख घरांमध्ये ग्रीटिंग देणार आहोत. या ग्रीटिंगच्या माध्यमातून शिवसेनेची गद्दारी उघड करणार. शिवसेना मुसलमानांच्या मांडीला मांडी लावून बसते आहे. मुसलमानांना आरक्षण दिले मात्र ते टिकणार नाही. सावरकरांना बलात्कारी म्हणणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना बसते. हे काय औरंगाबादचे रक्षण करणार,' असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.