औरंगाबाद 24 जानेवारी : विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर नाराज असलेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची नाराजी दूर झाल्याचं बोललं जातंय. पराभवानंतर त्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. नंतर गोपीनाथ गडावरच्या सभेत तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणाही साधला होता. हातातून गेलेली सत्ता आणि नाराज असलेले ज्येष्ठ नेते यामुळे दिल्लीतून सूत्र हालली गेली आणि तुमच्या सर्व गाऱ्हाण्यांची योग्य दखल घेण्याचं आश्वासन या नेत्यांना देण्यात आलं होतं. त्याचाच परिणाम म्हणून मराठवाड्यासाठी होणाऱ्या आंदोलनाचं नेतृत्व भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे दिलं आहे.
येत्या 27 जानेवारी रोजी पाणी प्रश्न तथा मराठवाड्यातील विविध प्रश्नासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे या औरंगाबादेतील विभागीय आयुक्त कार्यालया समोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
हे उपोषण पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. या उपोषणाला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणविस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप तर्फे देण्यात आलीय.
'फोन टॅपिंग' वादावर फडणवीसांनी सरकारला दिलं 'हे' आव्हान
औरंगाबाद कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी ही माहिती दिली आहे. भाजप वर नाराज असलेले एकनाथ खडसे येणार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मराठवाड्याचा प्रश्न आहे तरी त्यांना निमंत्रण देऊ ते नक्की येतील असा विश्वास बोराळकर यांनी व्यक्त केला. भाजपच्या या निर्णयामुळे पंकजा मुंडे यांची नाराजी दूर झाल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा...