पत्नीच्या मृतदेहाशेजारी रात्रभर बसून होते आजोबा, सरपंचांनी दिला 'माणुसकीचा खांदा'

पत्नीच्या मृतदेहाशेजारी रात्रभर बसून होते आजोबा, सरपंचांनी दिला 'माणुसकीचा खांदा'

घरात अठरा विश्वदारिद्रय..पत्नीच्या निधनानंतर सरण रचण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते.. पत्नीच्या मृतदेहाशेजारी रात्रभर बसून होते आजोबा.. सरपंचांनी 'माणुसकीचा खांदा' देत केले आजीचा अंत्यविधी..

  • Share this:

बीड,23 सप्टेंबर: घरात अठरा विश्वदारिद्रय..पत्नीच्या निधनानंतर सरण रचण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते.. पत्नीच्या मृतदेहाशेजारी रात्रभर बसून होते आजोबा.. सरपंचांनी 'माणुसकीचा खांदा' देत केले आजीचा अंत्यविधी.. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना बीड जिल्ह्यातील काकडहिरा या गावात घडली आहे.

अत्यंत हलाखीच्या परिस्थिती जीवन जगणारे शंकर सोनवणे यांच्या दिव्यांग पत्नीचे मंगळवारी रात्री निधन झाले. या वयोवृद्धाकडे पत्नीचे अंत्यसंस्कारासाठी देखील पैसा नव्हते. छोट्या झोपडीत शंकर सोनवणे हे पत्नीच्या मृतदेहाशेजारी रात्रभर बसून होते. पत्नीच्या अंत्यविधीसाठी सुध्दा त्यांच्याकडे पैसे नव्हते, अशा दुःखाच्या प्रसंगात दुर्दैवी वेळ या वयोवृद्धावर आली होती. यावेळी गावच्या सरपंचांनी त्यांना मदतीचा हात देत शंकर सोनवणे यांच्या पत्नीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडवले..

पाटोदा तालुक्यातील काकडहिरा गावातील शंकर सोनवणे या सत्तर वर्षाच्या वयोवृद्ध पत्नी जयश्री यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. या दाम्पत्याला मूलबाळ नाही. त्यात पत्नी दिव्यांग होती. सकाळी शेजारच्या लोकांनीही फक्त विचारपूस केली. अशा परिस्थितीत पत्नीचे अंत्यसंस्कार कसे करायचे, हा प्रश्न शंकर यांना पडला होता. काकडहिरा गावचे सरपंच प्रा. महादेव जायभाये यांना ही बातमी समजली तेव्हा त्यांनी तात्काळ जाऊन अंत्यविधी करण्याची सर्व जबाबदारी स्वीकारली व मुलाप्रमाणे अंत्यसंस्कार पार पाडले.

मुलगा गेल्याच्या धक्क्याने आले अपंगत्व..

काकडहिरा येथील मागासवर्गीय समाजाचे शंकर पांडुरंग सोनवणे हे दिव्यांग पत्नी जयश्री यांच्यासोबत राहत होते. गरीब परिस्थिती यामुळे ऊसतोडणी करून कुटुंब चालवत होते. मात्र, जयश्री गर्भवती असताना साखर कारखान्यावर ऊस तोडणीचे काम करावे लागल्यामुळे प्रसुतीच्या वेळीच त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. या धक्क्याने जयश्री यांना अपंगत्व आले होते. त्यामुळे त्यांचे ऊस तोडणीचे कामही बंद झाले. त्यानंतर त्यांना कोणतेही मूलबाळ झाले नाही. शंकर लोकांची गूरं सांभाळून आपल्या कुटुंबाची उपजिविका भागवत होते. परंतु गेल्या दहा वर्षांपासून त्यांनाही कोणतेही काम करता येत नव्हते. आपल्याला सांभाळणारे आपल्या पोटी कोणतेही मूलबाळ नाही. त्यातच काम करणेही बंद झाले. त्यामुळे शंकर यांची आर्थिक परिस्थिती आणखीच हलाखीची झाली. गावात लोकांच्या मदतीने कुटुंब चालवत होते.

घरात काहीही खायला नाही म्हणून जयश्री यांनी एक दिवसा अगोदर बनवलेला शिळा भात खाल्ला व त्यांना विषबाधा झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. अशा हलाखीच्या परिस्थितीत कोणताही नातेवाईक नाही व पत्नीचा अंत्यविधी करण्यासाठी जवळ एकही रुपया शंकररावांकडे नव्हता. तेव्हा हताश बसवलेल्या शंकरराव यांच्या मदतीला काकडहिरा गावचे सरपंच प्रा.महादेव जायभाये देवदूत म्हणून धाऊन गेले. अंत्यविधीची सर्व तयारी त्यांची केली. अंत्यविधी पार पडल्यानंतर वयोवृद्ध शंकरराव यांचे अश्रू पूसून आधार दिला. संपूर्ण जबाबदारी घेतली. 'माणूस म्हणून मी हे केले.. हे माझं कर्तव्य आहे', असा मोजक्या शब्दांत प्रा.महादेव जायभाय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रा.महादेव जायभाय यांच्या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.

5 वर्ष कुठे होता? प्रचारासाठी आलेल्या काँग्रेस आमदाराला आजीबाई सुनावले खडेबोल, VIDEO व्हायरल

First published: September 25, 2019, 8:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading