औरंगाबाद: आता हद्दच झाली! कुख्यात गुन्हेगार आणि त्याच्या मैत्रिणीचा मध्यरात्री मद्यधुंद डान्स VIDEO

औरंगाबाद: आता हद्दच झाली! कुख्यात गुन्हेगार आणि त्याच्या मैत्रिणीचा मध्यरात्री मद्यधुंद डान्स VIDEO

भररस्त्यावर धुडगूस घालणाऱ्या या गुन्हेगारावर सुरुवातीला कोणतीही कारवाई केली नव्हती आता VIDEO व्हायरल झाल्यावर पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.

  • Share this:

औरंगाबाद 23 ऑक्टोबर: तुरुंगातू बाहेर आलेल्या एका सराईत गुन्हेगाराने पुन्हा एकदा आपले प्रताप दाखवायला सुरूवात केली आहे. या गुंडाने दारू ढोसत तरुणीसोबत डान्स केला. कारच्या टपावर उभे राहत दारू घेत आणि सिगरेट ओढत तो आढळून आल्याने पोलिसही हादरून गेले आहेत. या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने शेवटी पोलिसांनी त्याला अटक केली असून तरुणीचा शोध सुरु आहे.

हा गुंड भररस्त्यात एका तरुणीसोबत कारवर उभे राहून दारू घेत आणि सिगारेट ओढत उभे डान्स केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून त्या तरुणीचा पोलीस शोध घेत आहेत.

गारखेडा परिसरातील कुख्यात गुन्हेगार शेख जावेद उर्फ टिप्या शेख मकसूद  याच्यावर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. गेल्यावर्षी एका खून प्रकरणात त्याचा समावेश होता. 13 जुलै 2019 रोजी त्याने प्रमोद दामोदर खाडे याला रात्री साडेअकराच्या सुमारास मारहाण करुन लुटले होते. त्यानंतर त्याला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक करत पिस्तुल व जिवंत काडतुसे हस्तगत केली होती.

याशिवाय विनयभंगाचे देखील गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्यामुळे तत्कालीन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी 9 ऑक्टोबर 2019 रोजी स्थानबध्दतेची कारवाई करत त्याची हर्सुल कारागृहात रवानगी केली होती.

त्यामुळे पोलिसांच्या डोक्यावरील बराचसा भार कमी झाला होता. मात्र, ही डोकेदुखी 30 सप्टेंबर रोजी हर्सुल कारागृहातून बाहेर पडली. त्यादिवशी देखील त्याच्या स्वागतासाठी अनेक गुन्हेगारांनी हर्सुल कारागृहाबाहेर गर्दी केली होती. या गुन्हेगारांनी त्याच्यासोबत कारागृहाबाहेरच फोटोसेशन करत व्हिडीओ फेसबुकवर टाकले. कारागृहातून सुटका होताच टिप्याने पुन्हा धुडगूस घालायला सुरूवात केली आहे.

हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ त्याच दरम्यानचा असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामधे मध्यरात्री भररस्त्यात तरुणीसोबत तो कारवर डान्स करत सिगारेट आणि दारू पिताना दिसत आहे. मात्र, भररस्त्यावर धुडगूस घालणाऱ्या या गुन्हेगारावर सुरुवातीला कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती आता पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. तिच्या सोबत असलेल्या तरुणीचा शोध मात्र पोलिसांना अजुन लागलेला नाही.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 23, 2020, 11:11 PM IST
Tags: aurangabad

ताज्या बातम्या