निलंगा 19 ऑक्टोबर: मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढलं आहे. शेतकऱ्यांचं सगळं पिक हातातून गेलं असून मोठं संकट ओढावलं आहे. खासदार संभाजीराजे यांनी समोवारी मराठवाड्यातल्या काही गावांना भेटी देत पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना धीर दिला. आपल्या या दौऱ्याचा अनुभव सांगताना संभाजीराजे म्हणाले, कर्नाटक सीमेलगत असलेल्या बोरसुरी गावच्या शिवरातून जवळपास दीड ते दोन किलोमीटर चालत जाऊन केटी बंधाऱ्यावर आम्ही पोचलो. पलीकडे सोनखेड गावचे शेतकरी वाहून गेलेल्या शेताकडे बघत बसलेले दिसले. आम्हाला जवळ आलेले बघून त्यांनी आर्त हाक दिली. आणि त्यांच्या व्यथा मांडल्या.
होतं तेवढं सगळं शेत पाण्याबरोबर वाहून गेलं आहे. आम्ही त्यांना धीर द्यायचा प्रयत्न केला. आत्महत्या करू नका, मी राज्याचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांना तुमची व्यथा सांगतो असा शब्द देऊन धीर दिला असं त्यांनी सांगितलं.
आमी आत्महत्या करायला तयार हाव...आवो काय, जगावं कसं बघा आम्ही? ही पलीकडं उभ्या असलेल्या शेतकरी कुटुंबाचे शब्द ऐकले, अन माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला की काय असं वाटून गेलं. काय बोलावं हेच क्षणभर सुचेनासे झाले होते अशी भावनाही संभाजीराजे यांनी व्यक्त केली.
निलंगा: खासदार संभाजीराजे यांनी समोवारी मराठवाड्यातल्या काही गावांना भेटी देत पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांनी जी व्यथा सांगितली ती ऐकून तेही गहिवरले pic.twitter.com/Z4XpdtK3qp
— News18Lokmat (@News18lokmat) October 19, 2020
ते पुढे म्हणाले, माझी सरकार ला विनंती आहे, की नदीच्या काठावरच्या, किंवा ओढ्याच्या काठावरच्या शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे लवकर करून घ्यावेत. माती वाहून गेलेल्या किंवा नदीचे बदललेले पात्र यावर विशेष पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेेते शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही आज ओल्या दुष्काळी दौऱ्यावर होते. सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना शक्य ती सर्व मदत करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.