आईस्क्रीम खायची म्हणून त्याने प्रेयसीला बोलावलं अन्.. रेल्वे ट्रॅकवर फेकले

आईस्क्रीम खायची म्हणून त्याने प्रेयसीला बोलावलं अन्.. रेल्वे ट्रॅकवर फेकले

एवढेच नाही तर आरोपी सचिन याने तिच्या पतीलाही यात अडकवण्याचा कट रचला होता.

  • Share this:

जालना,26 डिसेंबर: शहरातील मोती बागेजवळील म्हाडा कॉलनीजवळील रेल्वे रुळावर शनिवारी (21 डिसेंबर) सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास दीपाली रमेश शेंडगे या तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. चंदनझिरा पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आता मात्र पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. दीपाली शेंडगे हिची प्रियकराने निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आरोपी सचिन गायकवाड याला अटक करून या हत्येचे गूढ उकलले आहे.

धोका दिला म्हणून अद्दल घडवली...

सचिन गायकवाड आणि दिपालीचे प्रेमसंबंध होते. आरोपी सचिन गायकवाड याने गुन्हा कबूल केला आहे. दिपालीने लग्न करून धोका दिला. त्यामुळे तिला अद्दल घडवली, असे त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. एवढेच नाही तर आरोपी सचिन याने तिच्या पतीलाही यात अडकवण्याचा कट रचला होता.

आईस्क्रीम खायची म्हणून त्याने प्रेयसीला बोलावलं अन्..

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आईस्क्रीम खायला जाऊ म्हणून तरुणाने मुलीस अंबड रोडवर बोलावून घेतले. यानंतर तिच्याच स्कूटीवरून इंदेवाडी येथे नेले. त्या ठिकाणी तरुणीने माझे आता लग्न झाले आहे. आपल्याला आता भेटता येणार नाही, असे सांगून मोबाइलमधील लग्नाचे फोटो दाखवले. यामुळे रागात आलेल्या प्रियकराने मला बायकोने सोडले, तू का लग्न केले, असे म्हणत काहीतरी जड वस्तू तिच्या डोक्यात मारल्याने ती तरुणी बेशुद्ध झाली. यानंतर त्याने ओढणीने त्या बेशुद्ध तरुणीला स्वत:च्या शरीराला घट्ट बांधले व हळूहळू अंधारात स्कूटी मोतीबागेच्या रेल्वे रुळापर्यंत आणली. स्कूटी बाजूला उभी करून तिला रेल्वे रुळावर फेकले. यानंतर तिच्याच मोबाइलहून अविनाश वंजारे याच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याची सुसाइड नोट व लग्नाचे फोटो मोबाइलमधील विविध नंबरवर पाठवून फरार झाला होता. घटनास्थळावर त्या मृत तरुणीची स्कूटी, कॉलेज बॅग, मोबाइल मिळून आला होता. मोबाइलवरून मुलीच्या सर्व नातेवाइकांना काही फोटो व एक सुसाइड नोट मिळाली होती. ज्यात अविनाश वंजारे याच्यामुळे मी सुसाइड करत असल्याचे मेसेज पाठवले होते. दुसऱ्या दिवशी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून अविनाश वंजारे व इतर लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी परतूर येथून अविनाश वंजारे यास ताब्यात घेऊन तपास सुरू केला. तपासात सर्व घटनाक्रम प्रथमदर्शी बनाव असल्याचे लक्षात आल्यावर डीवायएसपी सुधीर खिरडकर यांनी पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांना एक विशेष पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. तपासात म्हाडा कॉलनी येथे मुलीच्या शेजारी राहणाऱ्या सचिन गायकवाड यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने खून केल्याची कबुली दिल्याची माहिती चंदनझिरा पोलिसांनी दिली. सचिन गायकवाड याने इंदेवाडी येथे दीपाली हिस मारहाण केल्यामुळे ती बेशुद्ध पडली होती. यामुळे तिला त्याने स्कूटीवरूनच रोडने आणले होते. यामुळे पोलिसांनी या तपासासाठी अंबड रोडवरील सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका ठिकाणी ही स्कूटी जाताना तिच्या पाठीमागे ही तरुणी डोके टाकून असल्याचे दिसून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 26, 2019 12:11 PM IST

ताज्या बातम्या