उद्धव ठाकरेंविरुद्ध पोलिसांत तक्रार.. तक्रारदार म्हणाला, 'माझं मत वाया गेलं'

उद्धव ठाकरेंविरुद्ध पोलिसांत तक्रार.. तक्रारदार म्हणाला, 'माझं  मत वाया गेलं'

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने महायुतीच्या नावाखाली मत मिळवली आणि आता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली.

  • Share this:

अभिषेक पांडे/सचिन जिरे,(प्रतिनिधी)

औरंगाबाद, 21 नोव्हेंबर: भाजपशी काडीमोड घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा करून शिवसेना राज्यात सत्ता स्थापन करत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि नवनिर्वाचित आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नावाखाली मते मिळवली आणि सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करून फसवणूक केल्याचे तक्रारदार रत्नाकर भीमराव चौरे (वय-34,रा.बेगमपुरा) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह चंद्रकांत खैरे, प्रदीप जैस्वाल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रत्नाकर चौरे यांनी केली आहे.

'माझं मत वाया गेलं'

मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाशिवआघाडी करून सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. तक्रारदार रत्नाकर चौरे यांनी यावर आक्षेप घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने महायुतीच्या नावाखाली मत मिळवली आणि आता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. यामुळे आमची फसवणूक झाल्याचे रत्नाकर चौरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

उद्धव ठाकरे, प्रदीप जैस्वाल आणि चंद्रकांत खैरे यांनी 10 ते 12 ऑक्टोबरदरम्यान औरंगाबादमध्ये प्रचार केला होता. हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी शिवसेना-भाजप महायुतीला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यामुळे मी आणि माझ्या कुटुंबाने त्यांच्या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेऊन महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना मतदान करुन निवडून दिले. निकालानंतर महायुतीसोबत सरकारही स्थापन केले नाही. शिवसेनेने भाजपशी युती तोडली. त्यामुळे मी भाजप समर्थक आणि हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी केलेले मतदान वाया गेले आहे. हिंदुत्त्वाच्या नावे मते मागून उद्धव ठाकरे यांनी माझी फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे रत्नाकर चौरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

महाशिवआघाडीचं ठरलं! 'या' 5 मुद्द्यांच्या आधारे चालणार सरकार

महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला सत्तापेच सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या ऐतिहासिक आघाडीचं सत्तासमीकरण जुळताना पाहायला मिळत आहे. मात्र सरकार स्थापनेनंतर विचारधारेच्या मुद्द्यावरून कोंडी होऊ नये म्हणून काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे. यातूनच काँग्रेसने शिवसेनेसमोर काही अटी ठेवल्याचीही माहिती आहे.

काँग्रेस आपल्या प्रतिमेबद्दल चिंताग्रस्त असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच शिवसेनेचं कडवट हिंदुत्व रोखणार कसं, असा काँग्रेससमोर प्रश्न आहे. कारण राम मंदिर, नागरिकता संशोधन विधेयक, कलम 370 या मुद्द्यांवर काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मतभेद असलेल्याचं याआधी दिसून आलं आहे. त्यामुळेच भविष्यात या मुद्द्यांवरून कोंडी होऊ नये म्हणून महाराष्ट्रात सत्तास्थापन करताना काँग्रेसने काही अटी ठेवल्या माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मांडलेल्या मुद्द्यांचा संभाव्य महाशिवआघाडीच्या सरकारवर प्रभाव असण्याची शक्यता आहे.

1. नव्या युतीने धर्मनिरपेक्ष या शब्दावर जोर दिला पाहिजे, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे.

2. सरकार स्थापन करताना कोणताही जातीय अजेंडा असू नये.

3. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सांगितले की ते खरे उदारमतवादी पक्ष आहेत.

4. समान कृती कार्यक्रमामध्ये सर्व पक्षांचे जाहीरनामा समाविष्ट केले जातील.

5. संयुक्त समित प्रत्येक पक्षाने जिंकलेल्या जागांच्या आधारे पोर्टफोलिओ वाटप करण्याचा निर्णय घेईल.

First published: November 21, 2019, 1:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading