मतदान केंद्रावरच भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, दोन जण गंभीर

मतदान केंद्रावरच भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, दोन जण गंभीर

या हाणामारीत राष्ट्रवादीच्या पोलिंग एजंटला बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलं.

  • Share this:

विजय कमळे पाटील, जालना 21 ऑक्टोंबर : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. जामखेड येथील मतदान केंद्र क्रमांक 5 आणि 6 वर भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन गटात भांडण झालं आणि भाडंणाचं पर्यवसन नंतर हाणामारी झालंय. आज दुपारी मतदान सुरू असतानाच ही घटना घडली. या हाणामारीत राष्ट्रवादीच्या पोलिंग एजंटला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत जामखेड गावच्या उपसरपंचासह  2 पोलिंग एजंट गंभीर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी अंबड येथील रुग्णालयात हलवन्यात आलंय. आपसातले राजकीय वाद असल्याने कार्यकर्त्यांमध्ये रोष होता. मतदान करताना काही शुल्लक कारणांवरून कार्यकर्त्यांनी एकमेकांना डिवचलं होतं. त्यानंतर हे भांडण झालं. त्यामुळे काही काळ तणावही निर्माण झाला होता. नंतर पोलिसांनी त्यावर नियंत्रण मिळवलं.

राज्यातल्या इतर काही भागातही हिंसाचाराच्या काही घटना घडल्या आहेत. अमरावतीमध्ये उमेदवारावरच हल्ला करण्यात आलाय. तर कुठे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालीय. तर कुठे बोगस मतदारांना ताब्यात घेण्यात आलंय.

मतदानानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

मोर्शीत उमेदवारावरच हल्ला

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदार संघात कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या विरोधात उभे असलेले आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सकाळी धनोडी वरुड गावापासून 6 किमी अंतरावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला चढवला. यात देवेंद्र भुयार बचावले असले तरी त्यांची कार मात्र पूर्णतः जळून राख झाली आहे. या घटनेनंतर भुयार यांच्या कार्यकाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. रक्तदाब कमी झाल्याने भुयार यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक हरिबालाजी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन देवेंद्र भुयार यांची भेट घेऊन चौकशी केली,  वाहनावर हल्ला करून कार जाळण्यात आल्याची कबुली खुद्द पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. देवेंद्र भुयार यांचा वाहन चालक व एका साथीदाराला वरुड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोर्शी मतदार संघात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केलंय.

शिवसेनेच्या बंडखोर कार्यकर्त्यांना मारहाण, एक जण गंभीर

करमाळ्यातही हाणामारी

करमाळ्यात मतदानला गालबोट लागलंय. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली. शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांनी असा आरोप केलाय.या मारहाणीत नारायण पाटलांचे कार्यकर्ते गंभीर जखमी झालेत. कार्यकर्त्यांच्या डोक्यात मारहाण झाल्याने कार्यकर्ता जखमी झाला.

VIDEO : मतदानाआधी पंकजा मुंडेंनी सहकुटुंब घेतलं वैद्यनाथाचं दर्शन

पिंपरीत बोगस मतदान

मतदानाच्या काळात बोगस मतदान रोखण्यासाठी आयोग सर्व काळजी घेत असते. मतदान केंद्रावर हजर असलेले सर्व पक्षांचे प्रतिनिधीही मतदान चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी काळजी घेत असतात. असं असतानाही पिंपरीत बोगस मतदान झाल्याचं आढळून आलंय. पिंपरी गावातल्या विद्यानिकेतन शाळेतल्या बुथ क्रमांक 303 वर हे बोगस मतदान झालं. शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांनी याबाबतची तक्रार केलीय. त्यानंतर पोलिसांनी असं मतदान करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतलंय. बोगस मतदान करणारे पाचही जण हे परप्रांतिय असून स्थानिक लोकांच्या नावावर ते मतदान करून गेले. आपण बोगस मतदान केल्याचं त्यांनीही कबूल केल्याची माहिती दिली जातेय. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत असून बोगस मतदान रोखण्याचं निर्धारही पोलिसांनी व्यक्त केलाय. सोलापूर आणि विदर्भातही निवडणुकीच्या काळात हिंसाचाराच्या घटना घडल्याने गालबोट लागलंय.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 21, 2019, 1:35 PM IST

ताज्या बातम्या