गणेश विसर्जन मिरवणुकीत खोतकर-दानवेंच्या युतीचे 'ढोल बाजे ढोल'

गणेश विसर्जन मिरवणुकीत खोतकर-दानवेंच्या युतीचे 'ढोल बाजे ढोल'

जालन्यात सध्या खोतकर आणि दानवे 'ढोल बाजे ढोल' म्हणत युतीचे ढोल वाजवत असले तरी भविष्यात सेना-भाजपत काडीमोड झाल्यास हीच मंडळी एकमेकांची ढोल फोडताना दिसणार का..? हे पाहणे औत्सुक्याच ठरणार आहे.

  • Share this:

जालना, 13 सप्टेंबर:आराध्य दैवत गणपती बाप्पाला अनंत चतुर्दशीला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. जालन्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे या दोघांनी ढोल वाजवत गणेश भक्तांचा उत्साह वाढविला. यावरून शिवसेना-भाजप युतीसोबतच खोतकर-दानवेंच्या युतीचे 'ढोल बाजे ढोल' अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले होते. एवढेच नाही तर दंड थोपटत लोकसभा निवडणुकीत दानवेंचा पराभव करण्याची भीष्मप्रतिज्ञा केली होती. त्यामुळे जालना जिल्ह्यातील राजकारणात मोठा भूकंप होऊन राज्यपातळीपर्यंतचे राजकीय समीकरणे बिघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. परंतु, अनेक नाट्यमय घडामोडींनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यापातळीवर दानवे आणि खोतकरांचे 'मनोमिलन' घडविण्यात आले होते. लोकसभेतील दानवे यांच्या विजयात खोतकरांसह शिवसैनिकांचा मोलाचा वाटा नाकारता येत नाही. राज्यात विधानसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले असून सध्या तरी सेना-भाजप युती कायम असल्याचे चित्र आहे. मात्र, जागावाटप आणि मेगाभरतीमुळे मतदारसंघ आदलाबदलीवरून सुरू असलेल्या वादाचे पर्यावसान युती विभक्त होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे जालन्यात सध्या खोतकर आणि दानवे 'ढोल बाजे ढोल' म्हणत युतीचे ढोल वाजवत असले तरी भविष्यात सेना-भाजपत काडीमोड झाल्यास हीच मंडळी एकमेकांची ढोल फोडताना दिसणार का..? हे पाहणे औत्सुक्याच ठरणार आहे.

विनापरवानगी बसवला शिवाजी महाराजांचा पुतळा..

दरम्यान, जालना जिल्ह्यातील अंबड येथील पाचोड चौकात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. पाचोड चौकात उभारण्यात आलेल्या चौथऱ्यावर भल्या पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास एका आयशर वाहनातून शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणून बसवण्यात आला. शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी शासनाची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही.

भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली हा पुतळा विनापरवाना बसविण्यात आला. दरम्यान, रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर आमदार नारायण कुचे यांच्यासह 41 जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांशी शाब्दिक चकमक..

यावेळी पोलीस आणि आमदार व समर्थकात शाब्दिक चकमक देखील झाली. अंबड शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, काही तरुणांनी अंबडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला असून लोकप्रतिनिधी म्हणून मी तिथं गेलो होतो, त्यात गैर काय पोलिसांनी मला का अटक केली. हे मला माहित नसल्याचे आमदार नारायण कुचे यांनी सांगितले आहे.

SPECIAL REPORT: भाजपचा आत्मविश्वास ओव्हर कॉन्फिडन्स तर ठरणार नाही?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2019 12:47 PM IST

ताज्या बातम्या