Elec-widget

पंकजा मुंडे भाजप सोडणार का? त्यांच्या विश्वासू आमदाराने केला मोठा खुलासा

पंकजा मुंडे भाजप सोडणार का? त्यांच्या विश्वासू आमदाराने केला मोठा खुलासा

'कुणी त्यांना भाजपमध्येच राहून दबाव टाकून मोठं पद मागून घ्या असा सल्ला दिलाय. तर काहींनी शिवसेनेत जाण्याचाही सल्ला त्यांना दिलाय. तर काही समर्थकांनी राजू शेट्टी यांच्यासारखा स्वतंत्र पक्ष काढण्याची सूचनाही त्यांना केलीय.'

  • Share this:

आशीष दीक्षित, मुंबई 01 डिसेंबर : भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे सध्या अस्वस्थ आहेत. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे त्या सध्या शांत असून त्याचं नेमकं काय चाललंय याची चर्चा गेली काही दिवस सुरू आहे. त्यातच त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्याने राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झालीय. 12 डिसेंबर हा दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा वाढदिवस आहे. त्या दिवशी आपली पुढची वाटचाल जाहीर करणार असल्याचे संकेत पंकजा मुंडे यांनी दिले होते. गेले काही दिवस मी शांत आहे. कार्यकर्त्यांना मला बोलायचं आहे. आणि मलाही कार्यकर्त्यांशी बोलायचं आहे. मात्र सध्या मला शांतता पाहिजे आहे. मला माझ्याशी संवाद साधायचा आहे. हा संवाद झाल्यानंतर पुढची वाटचाल कशी करायची हे ठरवायचं आहे असं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटलंय. तसच 12 तारखेला गोपीनाथ गडावर येण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

PM नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट रद्द करणार का? काय म्हणाले उद्धव ठाकरे?

त्यामुळे पंकजा मुंडे भाजप सोडून वेगळी वाट निवडणार का? याची चर्चा सुरू झालीय. मात्र पंकजा मुंडे यांचे विश्वासू महादेव जानकर यांनी मात्र न्यूज18 लोकमतशी बोलताना ही शक्यता फेटाळून लावली. पंकजाताई या कुठेही जाणार नाही, त्या भाजपमध्येच राहणार असल्याचंही ते म्हणाले. सोशल मीडियावर काय चर्चा होते त्याला काही अर्थ नाही. विधानसभा निकालानंतर त्या शांत आहेत हे खरं असलं तरी त्या लवकरच सक्रिय होतील असंही ते म्हणाले.

12 डिसेंबर या गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिवशी पंकजा मुंडे शक्ती प्रदर्शन करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. परळीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता.

देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याने सत्ताधाऱ्यांना पुन्हा भरली धडकी

Loading...

काय म्हणाल्या पंकजाताई...

नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे...

''निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकाल ही लागले. निकालानंतर राजकीय घडामोडी, कोअर कमिटीच्या बैठका, पक्षाच्या बैठका, हे सर्व आपण सर्वजण पहात होता. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला. आणि विनंती केली की कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये. सर्व जवाबदारी माझी आहे.

दुसऱ्याच दिवशी पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीस मी हजरही झाले.'आधी देश,नंतर पार्टी आणि शेवटी स्वत:' हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. जनतेप्रती आपल्या कर्तव्यापेक्षा मोठं काहीही नसतं असं मुंडेसाहेबांनी लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्यांच्या शिकवणी नुसार त्यांच्या मृत्युनंतर अगदी तिसऱ्याच दिवशी मी कामाला लागले.

पाच वर्षे सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मिळाली आणि आज पराभवानंतर माझ्याहीपेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला इतके मेसेजेस केले, इतके फोन केले, इतके निरोप दिले. "ताई आम्हाला भेटायला वेळ द्या," .."ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या "...किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली .

मी तुम्हा सर्वांची खुप खुप आभारी आहे. मला याची पुर्ण जाणीव आहे की तुमचं प्रेम हे माझ्यावर आहे आणि तेच माझं कवचकुंडल आहे. मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहील्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनते प्रती असलेल्या जवाबदारी म्हणुन राजकारणात राहीले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे.

आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे...

आठ ते दहा दिवसांनंतर...हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे.

12 डिसेंबर,लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस...त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त...जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं.. तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलतेय ...तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे..नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे?

12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू !!

येणार ना मग तुम्ही सर्व? मावळे येतील हे नक्की !!!!''

पंकजा मुंडे यांच्या या फेसबुक पोस्टवर त्यांच्या समर्थकांनी भरभरून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कुणी त्यांना भाजपमध्येच राहून दबाव टाकून मोठं पद मागून घ्या असा सल्ला दिलाय. तर काहींनी शिवसेनेत जाण्याचाही सल्ला त्यांना दिलाय. तर काही समर्थकांनी राजू शेट्टी यांच्यासारखा स्वतंत्र पक्ष काढण्याची सूचनाही त्यांना केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2019 07:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com