नांदेड 27 जानेवारी : राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजाला आता वेग येतोय. मात्र असं होत असतानाच सरकारमध्ये सहभागी असलेल्या तीनही पक्षांच्या नेत्यांच्या वक्तव्यांनी वेग वेगळ्या चर्चेंना तोंड फुटतंय. माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड इथं बोलताना शिवसेनेला थेट इशाराच दिलाय. शिवसेनेसोबत सरकारमध्ये येताना काँग्रेस हायकमांडने आम्हाला अतिशय कडक आदेश दिले होते. घटनाबाह्य काम करणार नाही असं शिवसेनेकडून लिहून घ्या असं आम्हाला बजावण्यात आलं होतं आणि आम्ही ते उद्धव ठाकरेंना सांगितलं अशी माहितीही अशोक चव्हाण यांनी दिली.
अशोक चव्हाण म्हणाले, तीन वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांचं सरकार आलं तर भांडणं होतं असं सोनिया गांधी यांना वाटत होतं. त्यामुळे सत्तेत सहभागी होऊ नये असं त्यांचं मत होतं. शिवसेना घटनाबाह्य काम करेल अशी भीतीही त्यांना वाटत होती. त्यामुळे आम्ही शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांना ते स्पष्टपणे सांगितलं आणि त्यांनीही घटनाबाह्य काम होणार नाही याचं आश्वासन दिलं अशी माहितीही त्यांनी दिली.
उद्धव सरकारवर नजर ठेवण्यासाठी राज ठाकरे घेणार आज मोठा निर्णय
ते पुढे म्हणाले, शिवसेनेने कुठलंही घटनाबाह्य काम केलं तर काँग्रेस सत्तेत राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. ज्या दिवशी सरकार आलं त्याच दिवशी हे ठरलंय असंही ते म्हणाले.