लातूर 14 ऑक्टोबर: परतणाऱ्या पावसाने राज्याला झोडपून काढलं आहे. लातूर जिल्ह्यातही प्रचंड पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची दैना झाली आहे. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील औराद शाहजनी शिवारातला तेरणा नदीचे पात्र फुटले आणि शेतात पाणी शिरलं. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून ठेवलं होतं पावसाच्या पाण्यात हे सोयाबीन वाहून गेलं. नंतर शेतकऱ्यांनी पावसातून दोरी बांधून धाडसाने ते परत आणलं.
सध्याचा काळ हा सोनायबीनच्या काढणीचा आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून ठेवलंय तर अनेकांचं काढणीला आलं आहे. अनेकांच्या शेतात झाडांनाच कोबं फुटली. पावसाच्या शक्यतेमुळे काही शेतकऱ्यांनी मेनकापडात सोयाबीन झाकून, बांधून ठेवलं होतं. मात्र पाऊसच एवढा झाला की सगळ्या शेतामध्ये पाणी पाणी झालं. त्यात सोयाबीन वाहून जायला लागलं.
डोळ्यासमोर आपलं स्वप्न वाहून जात असल्याने शेतकरी हवालदील झाले. मात्र त्यांनी हिंम्मत हारली नाही. दोरखंडाच्या साह्याने पाण्यात उतरून मोठ्या धाडसाने ते सोयाबीन काठावर आणलं.
कोरोनाच्या संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांना पावसानेही तडाखा दिला आहे. खरीपाचं पीक हातातून गेलं आता रब्बीही जाण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आहे.
लातूर: तेरणा नदीचे पात्र फुटलं आणि शेतात पाणी शिरलं. डोळ्यासमोर कष्टाने पिकवलेलं सोयाबीन वाहून जात असल्याचं दिसताच शेतकऱ्यांनी धाडस दाखवत ते स्वप्न परत आणलं. pic.twitter.com/0nhFMjQvyz
— News18Lokmat (@News18lokmat) October 14, 2020
दरम्यान, पुणे सोलापुर हायवे पावसामुळे बंद केला असुन उजनी धरणाचे पाणी भिगवण,डाळज,पळसदेव,इंदापुर येथे हायवेवर आले असल्याने पुण्यातुन सोलापुरकडे जाणारी वाहतुक लोणी काळभोर येथे थांबविली असुन कोणीही सोलापुर दिशेने प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. जर पावसाचे प्रमाण वाढले तर मुठा नदीत विसर्ग चालू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यातही हाय अलर्ट देण्यात आला आहे.