कोरोना टेस्टिंगबाबत भाजपच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप, राज्यात खळबळ

कोरोना टेस्टिंगबाबत भाजपच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप, राज्यात खळबळ

या खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार देखील झालेला आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते आणि माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे.

  • Share this:

जालना, 10 ऑक्टोबर : 'महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी दाखवण्यासाठी राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी खेळ सुरू केला असून 12 लाख 50 हजार पेक्षा अधिक सदोष असणाऱ्या RTPCR किट्स खरेदी करण्यात आल्या आहेत. या खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार देखील झालेला आहे,' असा गंभीर आरोप भाजप नेते आणि माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे.

कोरोना संसर्गाच्या कालावधीदरम्यान अँटीजन आणि आरटीपीसीआर अशा दोन प्रकारच्या चाचण्या प्रामुख्याने केल्या जातात. त्यातील अँटीजन चाचणी केल्यानंतर 06 ते 15 टक्क्यांपर्यंत खात्रीशीर निदान होते. परंतु आर टी पी सी आर या चाचणीमध्ये 30 टक्के खात्रीशीर निदान केले जाते, अशी मान्यता आहे. त्यासाठी 12 लाख 50 हजार कीट्स खरेदी करण्‍यात आल्या आहेत. परंतु नव्याने खरेदी करण्यात आलेल्या या किट्समध्ये अनेक दोष आढळून आल्याचा आरोप होत आहे.

बबनराव लोणीकर यांचा खळबळजनक आरोप, नेमकं काय म्हणाले?

कोरोना रुग्णांना प्रत्यक्ष सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्या डॉक्टरांनी डॉ तात्याराव लहाने यांच्या या बैठकीमध्ये प्रश्न उपस्थित केला व या किट्स सदोष असल्याबाबत विचारणा केली. त्यानंतर डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला गेला आहे.

कोरोना संसर्गाची तपासणी करण्यासाठी आलेल्या या किट्स सदोष असल्याचे लक्षात आले असून आरटीपीसीआर लॅबोरेटरीमध्ये 05 ऑक्टोबर पासून या किट्सचा वापर केल्यानंतर जालन्यात कोरोना व्हायरस संसर्गाच्या रूग्णांचे अहवाल देखील निगेटिव्ह येत आहेत. आयएमसीआरच्या तपासणीमध्ये हे सिद्ध झाले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून कोरोनाग्रस्त रुग्णांना नकारात्मक रिपोर्ट मिळाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा उपचार केला जाणार नाही. त्यात आणखी गंभीर बाब म्हणजे नकारात्मक रिपोर्ट मिळाल्यानंतर हे रुग्ण बिनधास्तपणे बाहेर फिरणार असून त्यांच्यामुळे इतरांना होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण खूप भयानक असणार आहे ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे असंही लोणीकर यांनी म्हटलं आहे.

कोरोनासारखे गंभीर संकट असताना अशा परिस्थितीत जनसामान्यांच्या आरोग्याची कोणत्याही प्रकारची काळजी नसून या सर्व अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावे आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली. याबाबत लोणीकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रही लिहिलं आहे. त्यामुळे आगामी काळात याबाबत नक्की काय घडामोडी होतात, हे पाहावं लागेल.

Published by: Akshay Shitole
First published: October 10, 2020, 7:46 PM IST

ताज्या बातम्या