माहेरी आलेल्या पत्नीला 'तलाक.. तलाक.. तलाक' म्हणून निघून गेला पती

माहेरी आलेल्या पत्नीला 'तलाक.. तलाक.. तलाक' म्हणून निघून गेला पती

तो पुन्हा सासुरवाडीत गेला हुंड्याचे राहिलेले 2 लाख रुपये मागितले. काही वेळानंतर त्याने पत्नीला तलाक.. तलाक..तलाक म्हणून तो घरातून निघून गेला.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम,(प्रतिनिधी)

औरंगाबाद, 14 ऑगस्ट- तिहेरी तलाक विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर मराठवाड्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. माहेरी आलेल्या पत्नीला तीन वेळा तलाक म्हणून पती निघून गेल्याच्या तक्रारीवरून औरंगाबाद शहरातील जिन्सी पोलीस स्टेशनमध्ये मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा 2019 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नारेगाव भागात राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीचा 2018 मध्ये शेख सलमान शेख लाल याच्यासोबत मुस्लिम रीतीरिवाजाप्रमाणे निकाह झाला होता. निकाहनंतर काही दिवसांत माहेरहून 2 लाख रुपये हुंडा आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून तरुणीचा छळ सुरू झाला. तरुणीच्या वडिलांनी सासरच्या मंडळींविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात छळाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाला वेगळे वळण देण्यासाठी सासरा शेख लाल शेख युसूफ याने जिन्सी पोलीस ठाण्यात सून हरवल्याची खोटी तक्रार दिली. मात्र, पोलीस चौकशीत ही बाब खोटी निघाल्याने सासरची मंडळी अडचणीत आली. त्यांनी जिन्सी पोलिसांसमोर चूक झाल्याचे कबूल करीत माफी मागितली आणि सुनेला नांदविण्याची ग्वाही दिली. मात्र, तरुणी सासरी जाताच सासऱ्याने तिची छेडछाड केली. याबाबत कोणाला सांगू नको म्हणून सासरा आणि पतीने तिला बेदम मारहाण केली. पती कामासाठी हरियाणा येथे जात असल्याने तिला माहेरी आणून सोडले. पती परत आला म्हणून तरुणी सासरी गेली. मात्र, आई-वडिलांचे ऐकून त्याने तरुणीला लाकडी दांड्याने मारहाण केली. सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणी पुन्हा माहेरी आली. नंतर तिला पतीने फोन करून तलाक देण्याची धमकी दिली. दरम्यान, सलमान शुक्रवारी (9 ऑगस्ट) पुन्हा सासुरवाडीत गेला हुंड्याचे राहिलेले 2 लाख रुपये मागितले. काही वेळानंतर त्याने पत्नीला तलाक.. तलाक..तलाक म्हणून तो घरातून निघून गेला.

या विधेयकात या आहेत तरतूदी..

तिहेरी तलाक विधेयकाचे पूर्ण नाव मुस्लिम महिला (महिला अधिकार संरक्षण कायदा) विधेयक, 2019 असे आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर तोंडी, लेखी आणि अन्य कोणत्याही माध्यमातून तीन वेळा तलाक देण्यावर बंदी असेल. अशा पद्धतीने तलाक दिल्यास तो गुन्हा ठरेल. अशा पद्धतीने पत्नीला तलाक दिल्यास तो गुन्हा असेल आणि त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येऊ शकेल.

तुरुंगवास आणि होणार दंड

एखाद्या व्यक्तीने पत्नीला तिहेरी तलाक दिल्यास त्याला 3 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकते. त्याच बरोबर त्याला दंड देखील होऊ शकतो. अशा पद्धतीने पतीवर गुन्हा दाखल केल्यास जामीन मिळवण्यासाठी त्याला न्यायालयात जावे लागेल. पत्नीला मिळणार नुकसान भरपाई जर एखाद्या महिलेला तिहेरी तलाक दिला तर ती महिला पतीकडून नुकसान भरपाई मागू शकते. अर्थात पत्नीला किती नुकसान भरपाई द्यावी हे निश्चित करण्यात आलेले नाही. पीडित महिलेला किती नुकसान भरपाई द्यावी हे न्यायालयातील सुनावणीनंतर निश्चित केले जाईल.

मुलाचा ताबा कोणाला मिळणार?

तिहेरी तलाक विधेयकानुसार पीडित महिला अल्पवयीन मुलाचा ताबा स्वत:कडे मागू शकते. मुलाचा ताबा कोणाकडे द्यावा याचा निर्णय न्यायालयातील सुनावणीनंतर केला जाईल.

NRI तरुणीची विवस्त्र होऊन नदीत उडी, VIDEO व्हायरल

Published by: Sandip Parolekar
First published: August 14, 2019, 3:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading