कन्हैय्या खंडेलवाल, हिंगोली 23 मार्च : कोरोना व्हायरसने सर्व जगभरच थैमान घातलंय. शहरी भागात त्याचा जास्त फटका बसला. आता ग्रामीण भागातल्या जनतेनेही काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात असून हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील नांदापूरच्या गावकऱ्यांनी नवीन व्यक्तींना गावात नो एन्ट्री केली आहे.
याबाबतचा निर्णय सोमवारी गावकऱ्यांच्या बैठकीत झाला आहे. या प्रकारचा निर्णय घेणारे नांदापूर हे राज्यातील पहिलेच गाव आहे. घरा बाहेर न जाणे, सतत हात धुणे, सॅनीटायझरचा वापर करणे यासह इतर सूचना दिल्या जात आहेत. या शिवाय गर्दीची ठिकाणे टाळण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत.
ग्रामसभेत कोरोनासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना सांगण्यात आल्या. त्यानंतर गावात नवीन व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गावातून बाहेरगावी जाणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या रजिष्टरला नोंद करूनच बाहेरगावी जायचे व परत आल्यानंतर त्याची नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच गावात प्रवेश करतांना हात धुऊनच प्रवेश करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.
हे वाचा -जनता कर्फ्यूमध्ये क्रिकेट खेळणं पडलं महागात, पोलिसांनी अशी काढली 'विकेट'
गावात येणारे सर्व रस्ते गावकऱ्यांनी बंद केले आहेत. केवळ एक मुख्य रस्ता सुरु ठेवण्यात आला असून त्या ठिकाणी दोन गावकऱ्यांची नियुक्ती केली आहे. या ठिकाणी गावातील व्यक्ती बाहेरून आल्यानंतर त्यांची नांवे नोंदवली जात आहे. तर इतर रस्त्यांवर काट्या टाकण्यात आल्या आहेत.
गावातून पुणे, मुंबई या सारख्या शहरात कामासाठी गेलेले गावकरी गावाकडे येत आहेत. 14 मार्चपासून गावात आलेल्या या गावकऱ्यांची नोंद घेण्यात आली आहे. आता पर्यंत 25 गावकरी गावात परतले असून त्याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. या गावकऱ्यांची आरोग्य विभागामार्फत तपासणी केली जात आहे.
हे वाचा -कोरोनाग्रस्त महिलेचा पुणे ते वेल्हा गावापर्यंत प्रवास, तब्बल 26 गावं क्वारंटाइन
गावात नवीन व्यक्ती महत्वाच्या कामासाठी आला असेल तर त्याला नेमके कोणत्या गावकऱ्याला भेटायचे याची माहिती घेतली जाणार आहे. त्यानुसार त्या गावकऱ्याला माहिती देऊन वेशीवर बोलावले जात असून त्या ठिकाणीच नवीन व्यक्तीची भेट घडवून आणली जाणार आहे.
गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तुर्तास नवीन व्यक्तींनी गावात प्रवेश करू नये. तसेच गावकऱ्यांनीही गावाबाहेर जातांना नोंदणी करूनच जावे असे आवाहन गावातील पंचायतीने केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.