93 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो

उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 22, 2019 05:22 PM IST

93 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो

बालाजी निरफळ,(प्रतिनिधी)

उस्मानाबाद,22 सप्टेंबर: उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. रविवारी उस्मानाबाद येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अध्यक्ष निवडीबरोबरच संमेलनाच्या तारखा तसेच संमेलनाचा कार्यक्रमही जाहीर केला जाणार आहे. त्यांच्या निवडीनंतर वसईत उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

कृतिशील विचारवंत आणि सुधारणावादी लेखक ही दिब्रिटो यांची महाराष्ट्राला ओळख आहे. गेल्यावर्षी त्यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. पुण्यात गेल्या वर्षी झालेल्या साहित्यिक-कलावंत संमेलनाचे अध्यक्षपद दिब्रिटो यांनी भूषविले आहे. आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ, रानकवी ना. धों. महानोर, ज्येष्ठ लेखक रा. रं. बोराडे या दिग्गजांची नावे सहा महिन्यांपासून चर्चेत होती. चपळगावकर वगळता इतर सर्वांनी जाहीरपणे नकार कळवला होता. त्यामुळे मराठवाड्याबाहेरील सर्वमान्य नाव असलेल्या दिब्रिटोंना पसंती देण्यात आली आहे.

आगामी संमेलन जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात साहित्य सोहळा आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. पाऊस समाधानकारक झाल्याने दुष्काळाची काळजी मिटली आहे. दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने त्याचेही प्रतिबिंब संमेलनावर उमटण्याची शक्यता आहे. 

याबाबत आमच्या प्रतिनीधींशी बोलताना फादरांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझ्या नावाची निवड ही अनपेक्षित व सुखद अशी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एक मोठी जबाबदारी यानिमित्ताने माझ्यावर सोपविण्यात आली आहे आणि निश्चितपणे मी ती पार पाडीन असेही त्यांनी सांगितले.

Loading...

VIDEO:'लफडी केली तर सहन करा'; राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांची पवारांनी घेतली फिरकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2019 05:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...