परळी 23 ऑक्टोबर: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाने मी आनंदी असून पक्षास यामुळे आणखी बळकटी मिळणार आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा पक्षातील माझ्या सारख्या तरुणांना फायदा होईल अशी प्रतिक्रिया राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या समवेत आयुष्यातील मोठा काळ घालवत पक्षाला बळ दिले, अनेक आमदार - खासदार निवडून आले, पक्ष संघटन वाढवले परंतु त्यांच्या सारख्या लोकनेत्यावर भाजपने व्यक्तिगत व राजकीय असा दुहेरी अन्याय केला व तो अजिबात योग्य नव्हता त्यांनी सांगितलं.
सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून नाथाभाऊंची ओळख असून त्यांच्या पूर्वीच्या पक्षात असताना मी त्यांच्या सोबत काम देखील केलेले आहे. 40 वर्षांपेक्षा प्रदीर्घ राजकीय व सामाजिक कारकीर्द असलेल्या नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाने पक्षाला नक्कीच बळ मिळेल तसेच माझ्या सारख्या तरुण कार्यकर्त्यांना त्यांच्या या अनुभवाचा फायदा होईल असं मतही मुंडे यांनी व्यक्त केलं.
खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाने भाजपचा खान्देशातील मोठा गड ढासळला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाथाभाऊना नक्कीच न्याय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वडिलांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त पारंपरिक भागवत कथा सप्ताह सुरू असल्यामुळे मी परळीत आहे, अन्यथा मी सुद्धा नाथाभाऊंच्या स्वागत सोहळ्यास व्यक्तिशः उपस्थित राहिलो असतो, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार म्हणाले, राज्याचे ज्येष्ठ नेते, माननीय एकनाथरावजी खडसे साहेबांचे मी राष्ट्रवादी पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. मा.खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे.
एकनाथ खडसेंनी गर्भित इशारा दिलेली ती CD कुणाची? राजकीय चर्चेला उधाण!
खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी त्यांच्या नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल. खडसेसाहेब, रोहिणीताई खडसे, त्यांच्यासह पक्षप्रवेश केलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे पक्षामध्ये हार्दिक स्वागत! पक्षात आपल्या ज्येष्ठत्वाचा, अनुभवाचा निश्चित सन्मान होईल, असा विश्वास देतो असंही अजित पवारांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.