छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकण्याचा भाजपचा कट-धनंजय मुंडे

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकण्याचा भाजपचा कट-धनंजय मुंडे

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, भारतीयांचा जाज्वल्य अभिमान असलेल्या शिवछत्रपतींचा घोर अपमान उठता बसता छत्रपतींचे नाव घेणाऱ्या सरकारने केला आहे.

  • Share this:

सुरेश जाधव,(प्रतिनिधी)

बीड,17 ऑक्टोबर: चौथीच्या पुस्तकातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार करण्यात आल्याने विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, भारतीयांचा जाज्वल्य अभिमान असलेल्या शिवछत्रपतींचा घोर अपमान उठता बसता छत्रपतींचे नाव घेणाऱ्या सरकारने केला आहे. गेल्या 50 ते 60 वर्षांपासून चौथीच्या पाठ्यपुस्तकातील छत्रपतींवरील धडा वगळण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने घेतला आहे. हा निर्णय अत्यंत चूकीचा आणि अपमानास्पद असल्याचे सांगितले तसेच छत्रपतींवरील धडा वगळू नये, या विधिमंडळाने केलेल्या ठरावाचेही उल्लंघन या सरकारने केल्याची टीका त्यांनी केली. महाराजांचा इतिहास जनमानसातून पुसून टाकण्याच्या भाजपाचा हा कट असल्याचे म्हणत शिवछत्रपतींचा अपमान करणाऱ्या भाजपला 21 तारखेला धडा शिकवल्या शिवाय जनता आता स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमातून शिकवण्यात येतो. जवळपास अर्ध्या शतकाहून अधिक वर्षांपासून शिवरायांचे धडे चौथीच्या अभ्यासक्रमातून शिकवले जात आहेत. याआधी शिवाजी महाराजांच्या इतिहासाला केंद्रीय शिक्षण मंडळाकडून पुरेसं स्थान देत नसल्याबद्दल राज्यभरातून नाराजी व्यक्त केली जात होती. आता आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळानेही केंद्रीय शिक्षण मंडळाच्या पावलावर पाऊल टाकले आहे. राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यात मतांच्या राजकारणासाठी शिवाजी महाराजांचे नाव प्रत्येक व्यासपीठावर घेतले जात आहे. पण महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहासच वगळला आहे. राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थांना स्थानिक संस्कृतीसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण मिळावे यासाठी स्थानिक भाषेत शिक्षण देणाऱ्या शाळांना आंतरराष्ट्रीय असे बिरुद लावले आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करण्यात आले. स्थापनेनंतर वर्षभर पुस्तकांशिवाय या शाळा चालवण्यात आल्या. या शाळेची पहिली ते चौथीची पुस्तके ऑगस्टमध्ये छापली गेली. त्यानंतर चौथीच्या पुस्तकात शिवरायांचा इतिहासच वगळल्याचे समोर आले आहे.

चौथीच्या अभ्यासक्रमात असलेल्या इतिहासाच्या पुस्तकात 1991 मध्ये बदल करण्यात आला होता. तेव्हा मोठा वाद झाल्यानंतर शिवाजी महाराजांचा चौथीच्या पुस्तकातील इतिहास न बदलण्याचा ठराव विधिमंडळात झाला होता. त्यानंतर 2010 मध्ये अभ्यासक्रमाची पुनर्रचनाही झाली मात्र चौथीचं इतिहासाचं पुस्तक तसेच ठेवण्यात आले. 1970 मध्ये इतिहासाचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर काही ठराविक बदल वगळले तर पुस्तक तसेच ठेवण्यात आले आहे. पण आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने मात्र यात बदल केले आहेत.

काय म्हणाले अशोक चव्हाण...

आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमातून शिवरायांचा इतिहास हद्दपार करणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारला हद्दपार करण्याची हीच वेळ असल्याचे काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. तर खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनीही संताप व्यक्त केला असून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा घाट घातला असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही असं म्हटलं आहे. तसेच ज्यांनी कुणी ही आगळीक केली असेल त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.

VIDEO : 'देवेंद्र फडणवीस ठरवणार उपमुख्यमंत्री', पाहा काय म्हणाले अमित शाह

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 03:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading