देव दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात; एक जागीच ठार, 15 जखमी

देव दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात; एक जागीच ठार, 15 जखमी

देव दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला असून त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला

  • Share this:

औरंगाबाद,4 जानेवारी: देव दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला असून त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 15 भाविक जखमी झाले आहेत. औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील पालोद (ता.सिल्लोड) फाट्यावर हा अपघात झाला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. दामोदर लक्ष्मण खैरनार (वय-58, रा.पिंपळगाव बाखारी, ता.देवळा,जि.नाशिक) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.

सखुबाई पांडव (55), इंदूबाई महाजन (65), कमल सानप (50), सुनंदा सांगळे (55), विनया शेळके (54), अरुण गांगुर्डे (60), भास्कर गांगुर्डे (65), सुनंदा शिंदे (61), सुखदेव शिंदे (61), कुसुम पवार (55) सर्व रा.नाशिक, जिजाबाई बापूराव नर्गे (60) नांदगाव, सविता अरुण पेरे (40), फुलंब्री), सुनंदा मोरे (51) मुंबई, निर्मल खैरनार (64) मुंबई, मंदाकिनी पवार (धुळे), अशी जखमींची नावे आहेत.

मिळालेली माहिती अशी की, औरंगाबाद येथील पडेगाव परिसरातील जय फिरस्ता माता ट्रॅव्हल्स कंपनीची खासगी बस क्रमांक (एमएच.12 एक्यू 6565) नाशिक येथून यात्रेकरूंना घेऊन गंगासागर येथे दर्शनासाठी बुधवार (1 जानेवारी) रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास निघाली होती. बसमध्ये एकूण 43 प्रवासी होते. गुरुवारी ही बस सिल्लोडमार्गे मुक्ताईनगरकडे निघाली होती. पालोद गावाजवळ बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उलटली. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 15 भाविक जखमी झाले आहेत. अपघात होताच चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. बसमधील प्रवाशी एकमेकांच्या मदतीने गाडीबाहेर पडले. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पोलिस वाहनातूनच सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी संतोष खैरनार (रा.पिंपळगाव वाखारी, ता. देवळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसचालक कैलास चव्हाण (रा.गल्लेबोरगाव) याच्या विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बस चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 4, 2020 09:05 AM IST

ताज्या बातम्या