बीड, 17 एप्रिल : कोरोना व्हायरसचा संसर्ग राज्यात वाढत आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर, सरकारी कर्मचारी आणि पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत. न थकता न थांबता त्यांची सेवा सुरू आहे. लोकांनी बाहेर येऊ नये यासाठी वारंवार आवाहन करत आहेत. नागरिकांना घरी राहा सांगताना मात्र स्वत: कटाक्षानं कुटुंबाच्या सुरक्षेसाठी घरापासून लांब राहाणं स्वीकारणाऱ्या पोलिसाची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बीड ग्रामीण इथे वडील पोलीस निरीक्षक सुजित बडे हे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत. नागरिकांनी विनाकारण बाहेर येऊ नये कोरोना त्यांच्या घरापर्यंत पोहोचू नये लॉकडाऊनचं पालन करावं यासाठी पोलिसांची रात्रंदिवस गस्त सुरू आहे. मात्र हे पोलीस निरीक्षक स्वत:च्या घरापासून कित्येक दिवस लांब आहेत. त्यांना दोन वर्षांच्या चिमुकला मुलगा आहे. रोज उठल्यावर आपल्या वडिलांना पाहणाऱ्या या काळजाच्या तुकड्याला लॉकडाऊन आणि कोरोनामुळे जवळ घेत आलं नाही याचं दु:ख मनात आहे. पण आपल्या चुकल्यापर्यंत कोरोना पोहोचू नये आणि त्याला आपल्यासोबत बोलता यावं यासाठी ते घरासमोरील गॅलरीत उभं राहतात आणि सुरू होतो तो त्यांच्यातील संवाद.
हे वाचा-खूशखबर! तब्बल 6 भारतीय कंपन्यांनी शोधलं कोरोनावर औषध पण...
कर्तव्यदक्षता आणि कुटुंबावरील प्रेम या दोघांची सांगत घालून सुवर्णमध्य साधत पोलीस निरीक्षकांनी हा पर्याय काढला आहे. दोघंही सोशल डिस्टन्सिंगचं भान राखून समोरासमोर गॅलरीत उभं राहून बोलत असतात. त्यांच्या या संवादारम्यानचे हे निशब्द आणि सुन्न करणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
'मी त्याच्यापासून वेगळं का राहातो हे त्याला कदाचित आता उमगणार नाही पण मी त्याला एकदा गो कोरोना म्हणायला शिकवलं होतं. तो म्हणतो तेव्हा खूप हसायला येतं हे त्याला समजलं आणि तो मी दिसल्यावर ते म्हणायला लागला. आमच्या गप्पांदरम्यान कधी फोन आला तर त्याच्या चेहरा हिरमूसतो आणि माझा डॅडा तिकडे राहातो असं सांगतो. कदाचित तोही कोरोना जाण्याची खूप वाट पाहात असावा. तोही डॅडा सोबत मस्ती करण्याची वाट पाहात असेल. पण त्याला मी समोर का राहातो आणि त्यातले धोके कळायला अजून वेळ लागेल. 'असा आपला अनुभव त्यांनी फोटोसह फेसबुकवर शेअर केला आहे.
हे वाचा-मेच्या पहिल्या आठवड्यात मिळणार चांगली बातमी, गृह मंत्रालयाने दिले संकेत
त्यांची ही भावुक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. त्यांनी नागरिकांना आपल्या चिमुकल्यांसोबत घरी राहा सुरक्षित राहा असं आवाहन केलं आहे. अत्यावश्यक कामाविना बाहेर पडू नका आणि लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करा असंही पोलीस निरीक्षक सुजित बडे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.
हे वाचा-या देशात लोकांनी लॉकडाऊनची लावली वाट, पोलिसांनी 18 जणांना गोळ्या घालून केलं ठार
संकलन, संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.