जालना 9 डिसेंबर: कोरोनामुळे मृत्यूची भीती समाजात निर्माण झाली आहे. कधी कुणाला मृत्यू गाठेल हे काहीच सांगता येत नाही. घरातल्या अंगणात खेळणाऱ्या शेतकऱ्याच्या दोन मुलींचा (Farmers daughter) एका अपघातात करुण अंत झाला. जालना ते सिंदखेड राजा रोडवरील नाव्हा शिवारात हा अपघात (Accident ) घडला. या अपघाताने या शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला असून मुलींच्या मृत्यूमुळे सर्व शिवारातच शोककळा पसरली आहे.
जालना ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नाव्हा शिवारात हायवेला लागूनच एका शेतकऱ्याचे झोपडीवजा घर आहे. घराच्या समोर छोटसं अंगण आणि त्याला लागून हायवे जातो. याच अंगणात या शेतकऱ्याच्या मुली खेळत होत्या. त्यातली एक 5 तर दुसरी 7 वर्षांची होती. खेळण्यात दंग असतानाच अचानक एक मोठा कंटेनर वेगात त्या अंगणातून सरळ घरामध्ये घुसला. त्यावेळी अंगणात खेळत असलेल्या मुली त्या कंटनेरखाली सापडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातामुळे घराचेही नुकसान झालं आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा कंटनेर मार्गावरून भरकटला आणि या घरामध्ये घुसल्याचं सांगण्यात येतेय. माहिती मिळताच जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कंटेनरच्या ड्रायव्हरची पोलीस चौकशी करत असून गाडीची कागदपत्रही तपासण्यात येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.