Home /News /maharashtra /

पंकजा मुंडेंकडून शरद पवारांचं तोंडभरून कौतुक, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

पंकजा मुंडेंकडून शरद पवारांचं तोंडभरून कौतुक, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांच्या कार्यशैलीचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

    मुंबई, 27 ऑक्टोबर : ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यादेखील उपस्थित होत्या. बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांच्या कार्यशैलीचं तोंडभरून कौतुक केलं आहे. 'शरद पवार यांना सलाम. कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले...पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे,' असं ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय संघर्ष सुरू आहे. मात्र आता ऊसतोड कामगारांच्या प्रश्नाच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मुंडे भाऊ-बहिण मनसोक्तपणे बोलले... बीड जिल्ह्यातील राजकीय शत्रू असलेले आणि नात्याने बहिण-भाऊ असलेले पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आज मात्र ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयोजित बैठकीत एकत्र पाहायला मिळाले. इतकंच नव्हे तर बैठकीत खुद्द शरद पवार यांच्या बाजूला धनंजय मुंडे हे आणि त्यांच्या शेजारी होत्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे. बैठक झाल्यानंतर जवळपास दहा ते पंधरा मिनिटे दोन्ही बहिण-भाऊ एकमेकांशी चर्चा करत होते. दोनच दिवसापूर्वी दसऱ्या मेळाव्यांतर धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्यावर टीका केली होती. मात्र आजच्या बैठकीत हे दोघे बहिण भाऊ मनमोकळ्या मनाने बोलत होते. समाजहिताच्या प्रश्नावर आम्ही दोघे एकत्र आलो तर यात वावगं काहीच नसल्याचं धनंजय मुंडे म्हणाले, तर आम्ही दोघे एकत्र आलो म्हणून काही चांगलं होण्याचा प्रश्न नाही, नाहीतर आमच्या पक्षांचा प्रॉब्लेम होईल, असं मिश्किलपणे उत्तर देत सध्यातरी आम्ही राजकारणात वेगवेगळेच राहू असं पंकजा यांनी स्पष्ट केलं आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Pankaja munde, Sharad Pawar (Politician)

    पुढील बातम्या