कुणाची हानी होणार नाही असा 'भूकंप' करणार, पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

कुणाची हानी होणार नाही असा 'भूकंप' करणार, पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

आता मी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर कशी टीका करणार. तो अधिकार आता मला नाही असं सांगत त्यांनी 80 तासांच्या सत्ता प्रयोगावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.

  • Share this:

परळी 11 डिसेंबर : मी 12 डिसेंबरला पुढच्या वाटचालीबद्दल बोलणार आहे असं सांगत महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ निर्माण करणाऱ्या पंकजा मुंडे यांनी आज आपलं मौन सोडलं. काही दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुक पोस्ट लिहून 12 डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिवशी बोलणार असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर पंकजा मुंडे यांनी मौन स्वीकारलं होतं. त्या नाराज असल्याचं सांगत त्या भाजप सोडण्याचा विचार करताहेत अशीही चर्चा झाली. उद्या (12 डिसेंबरला) गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी त्या परळीत आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज अनेक प्रश्नांना मोकळी आणि रोखठोक उत्तरं दिली. माझ्या बोलण्याने भूकंप होणार अशा चर्चा होत असताना त्या म्हणाल्या की, भूकंप हा कधीच चांगला नसतो. पण उद्या कुणाची हानी होणार नाही असा भूकंप करणार असल्याचं मोठं वक्तव्य त्यांनी केलंय.

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकावरून भाजपचा खुलासा, खडसेंना दिलं उत्तर!

पंकजा मुंडे म्हणाल्या, मी पक्ष सोडणार याची चर्चाच कशी झाली याचं मला आश्चर्य वाटतं. मी कधीही तसं म्हटलं नाही की संकेत दिले नाहीत. मी पक्षासाठी सतत झटत असते. भाजपमधले मोठे OBC नेते पराभूत झाल्यामुळे काही वेगळी चर्चा सुरू झाली. हे नेते पराभूत झाले हे मात्र सत्य आहे. त्याचा सगळ्यांनीच विचार केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

पंकजा मुंडे यांची नाराजी आताच का आली उफाळून? ही आहेत 3 महत्त्वाची कारणं

देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या मदतीने सत्ता स्थापन केली त्यावर त्यांनी सावधपणे उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, आता मी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर कशी टीका करणार. तो अधिकार आता मला नाही असं सांगत त्यांनी 80 तासांच्या सत्ता प्रयोगावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.

मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे असं कधीही म्हटलेलं नाही. ते मुद्दाम पसरविण्यात आलं. त्याचा मला प्रचंड त्रास झाला असंही त्यांनी सांगितलं. मी उद्या कार्यकर्त्यांशी आणि महाराष्ट्राशी संवाद साधणार आहे असंही त्यांनी सांगितलं.

मुंडे यांच्या स्मारकावरून भाजपचा खुलासा

भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. श्री गोपीनाथजी मुंडे यांचा उद्या जयंती दिन! औरंगाबाद येथे त्यांचे भव्य स्मारक व्हावे, यासाठी राज्यातील भाजपा सरकारने पुढाकार घेतला. 19 सप्टेंबर 2019 रोजी सिडकोने या स्मारकासाठी लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स दिले. 25 नोव्हेंबर 2019 रोजी स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मारकाच्या कामाचा कार्यादेश (Work Order) सुद्धा देण्यात आला. हे स्मारक 2 वर्षात पूर्ण व्हावे, असे भाजपा सरकारनेच निश्चित केले होते. हे काम लवकर पूर्ण होऊन स्मारक आकारास येईल, अशी आशा करू या! असं ट्वीट करत त्यासंबंधीचे काही कागदपत्रही सादर केले आहेत.

 

Published by: Ajay Kautikwar
First published: December 11, 2019, 6:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading