बीड,4 जानेवारी: बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मुंडे बहीण-भावाची प्रतिष्ठा पणाला लागली आहेत. यात कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे शनिवारी पहिल्यांदा बीडमध्ये दाखल झाले आहेत. जिल्ह्यात महत्त्वाच्या निवडणूक असूनही पंकजा मुंडे मात्र परदेश दौऱ्यावर आहेत.
भाजपाच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे देखील बीडमध्ये तळ ठोकून आहेत. जिल्हा परिषदेचा गड राखण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे तर बहुमताचा आकडा जुळवाजुळव करत राष्ट्रवादी काँग्रेसन भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे. सध्या तरी भाजपमधील चार सदस्य राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. शिवसेना कोणच्या पारड्यात मतदान करणार यावर बीड जिल्हा परिषदेवर सत्ता कोणाची हे ठरणार आहे.
60 सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत 5 अपात्र सदस्य, दोन आमदार सदस्यानी राजीनामा दिल्यामुळे 53 हा आकडा आहे. बीड जिल्हा परिषदेत बहुमत मिळवण्यासाठी 27 हा जादुई आकडा आहे. धनंजय मुंडे गटाकडे दोन दिवसापूर्वी केवळ 23 सदस्यांचे संख्याबळ होत आहे. तर भाजपकडे 26 सदस्य असल्याचा दावा केला जात आहे. भाजपमधील चार सदस्य आणि शिवसेना 4 असा 31 चा आकडा राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे. अद्याप अध्यक्ष, उपाध्यक्ष नावे ठरली नाहीत. बीड शहराजवळील सनराईज हॉटेलमध्ये 12वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेसची धनंजय मुंडेच्या अध्यक्षते खाली बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचा अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा उमेदवार ठरणार आहे. यासाठी धनंजय मुंडे बीडमध्ये दाखल झाले आहेत.
पंकजांच्या खेळीनंतर कोण ठरणार किंग मेकर?
दरम्यान, महाराष्ट्रात सगळ्यात चर्चेची आणि प्रतिष्ठेची बीड जिल्हा परिषदेची अध्यक्ष सभापती निवड येत्या 4 जानेवारीला होत आहे. यामुळे बीडचे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीचे सर्वाधिक जि.प सदस्य निवडून येऊन देखील पंकजा मुंडेनी राजकीय खेळी करत अडीच वर्षापूर्वी जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवत बाजी मारली होती. यात भाजपा, शिवसेना, शिवसंग्राम, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाच बंडखोर अशी राजकीय खिचडी करत सत्ता समीकरण जुळवले होते. पण विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेच्या पराभवानंतर पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत वर्चस्व मिळवण्यासाठी सध्या प्लान सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडीने सरकार स्थापन करताच धनंजय मुंडेदेखील जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
बीड जिल्हा परिषदेत 60 सदस्य आहेत. यापैकी 26 राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले. त्यात व्हीपमध्ये 5 जण अपात्र ठरवण्यात आले आहेत. यामुळे बहुमताच्या आकडा 27 वर आला आहे. त्यामुळे आता खरी कसोटी पहायला मिळणार आहे. धनंजय मुंडेना मंत्रीमंडळ विस्तारात संधी मिळाली तर मिनी मंत्र्यांलय ताब्यात घेण्यासाठी साम-दाम-दंड-भेद वापरले जावू शकतात. यातच राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र आहे म्हणून बीड जिल्हा परिषदेत निर्णायक शिवसेनेच्या चार सदस्यावर कमान आहे. माजी मंत्री बदामराव पंडित कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असेल.
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आता नव्या जोमाने कामाला लागल्या आहे. बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष /उपाध्यक्ष पदाच्या निवडीसंदर्भात पंकजा मुंडेंनी जिल्हा परिषद सदस्याची महत्वपूर्ण बैठक घेतली. विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तातर झाले असले तरी बीडची जिल्हा परिषद भाजपच्याच ताब्यात राहिल असा विश्वास पंकजा मुंडे यांनी या पूर्वी बोलून दाखवला होता. 26 सदस्यांना घेऊन भाजपा सहलीवर आहे. तर 23 सदस्य घेवून राष्ट्रवादी सूत्र जुळवत आहे. राज्यात काही असलं तरी बीडची सत्ता भाजपाकडे राहील असं राजकीय विश्लेषक शिवराज बांगर यांनी सांगितलं आहे.
असं आहे संख्याबळ
भाजप-17
अपक्ष-निंबाळकर 1
शिवसंग्राम-4
शिवसेना-4
काँग्रेस-2
मुंदडा गट-1
रामदास बडे- 1
राष्ट्रवादी- 23
पोटनिवडणूक-2
अपात्र सदस्य-5
एकूण - 60
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी भाजपामध्ये रस्सी खेच सुरू आहे. यात सारिका डोईफोडे, योगींनी थोरात यांच्या नावाची चर्चा सुरू आहे तर राष्ट्रवादीमधून आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री रेखाताई क्षीरसागर, आशा दौंड यांच्या नावाची चर्चा आहे. धनंजय मुंडे यांनी चाचपणी सुरू आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी समीकरण जोडण्यासाठी धावपळ सुरू आहे. त्यात घोडे बाजारही जोरात सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.