Home /News /maharashtra /

बलात्कार पीडितेला न्याय देण्याची मागणी करताना आईला भोवळ, बीडमधील घटना

बलात्कार पीडितेला न्याय देण्याची मागणी करताना आईला भोवळ, बीडमधील घटना

मुलीला न्याय द्या, अशी मागणी करत असतानाच पीडितेच्या आईला भोवळ आल्याने त्या खाली बसल्या.

बीड, 12 ऑक्टोबर : शिरूर कासार येथील एका दहा वर्षीय मुलीवर बलात्कार झाला. त्यानंतर पीडितेच्या आईने बीडमध्ये होत असलेल्या आंदोलनात आरोपीला फाशी शिक्षा द्या, अशी मागणी करत आर्त टाहो फोडला. मुलीला न्याय द्या, अशी मागणी करत असतानाच पीडितेच्या आईला भोवळ आल्याने त्या खाली बसल्या. याच आंदोलनात बीडमधील भाजप खासदार प्रीतम मुंडे या राज्य सरकारविरोधात चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. हाथरस येथील घटनेवर बोलणारं राज्य सरकार महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचारावर गप्प का? असा सवाल भाजपाच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी केला आहे. महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यात राज्य सरकार अपयशी झाले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना राज्य सरकारकडून कुठलीही उपाययोजना केली जात नाही, असा घणाघात करत प्रीतम मुंडे यांनी राज्य सरकारवर टीका केली. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांसंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी हजारो महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. एकीकडे महिलांवरील अत्याचार वाढत असताना पोलीस प्रशासन व राज्य सरकार याबाबत ठोस उपाय योजना करत नसल्याचा आरोप करत राज्य सरकार विरोधात या आंदोलनाद्वारे नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्रात होणाऱ्या महिला अत्याचारावरून भाजपच्या अनेक महिला नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'महाराष्ट्रातल्या लेकीबाळी रस्त्यावर पडल्या आहेत का? राज्यात दिवसेंदिवस चिमुरड्या मुली/महिलांच्या अब्रूचे लचके तोडले जात आहेत. महिला आयोगाला अध्यक्ष नाही. कोविड-क्वारन्टाइन सेंटरमध्ये वांरवांर मागणी करूनही SOP नाही केली. याची जबाबदारी शासनकर्ते कधी घेणार?,' असा सवाल करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर काही दिवसांपूर्वी टीका केली होती.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Beed, Rape case

पुढील बातम्या