धक्कादायक! अंगावर पेट्रोल टाकून आईला जाळण्याचा प्रयत्न, संतापजनक कारण आलं समोर

धक्कादायक! अंगावर पेट्रोल टाकून आईला जाळण्याचा प्रयत्न, संतापजनक कारण आलं समोर

याप्रकरणी नराधम दोन्ही मुलांना अटक केली असून पुढील तपास केज पोलीस ठाणे करत आहे.

  • Share this:

बीड, 4 ऑक्टोबर : माय-लेकराच्या नातेसंबंधांला काळीमा फासणारी घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कानडीमाळी येथे घडली आहे. मुलानेच पैशासाठी आईला जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालं आहे. या घटनेत सरपंचांच्या तत्परतेमुळे दुर्दैवी मातेचा जीव वाचला. याप्रकरणी नराधम दोन्ही मुलांना अटक केली असून पुढील तपास केज पोलीस ठाणे करत आहे.

50 वर्षीय इंदूबाई लालासाहेब कुचेकर असं जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या आईचं नाव आहे. त्यांना संतोष, नितीन आणि धीरज अशी तीन मुले आहेत. संतोष व नितीन हे दोघे बीडला राहतात, तर इंदुबाई या धीरज सोबत गावी राहतात. इंदूबाईचे पती लालासाहेब हरिभाऊ कुचेकर बीड पोलीस दलात कार्यरत होते. परळी शहर ठाण्यात कार्यरत असताना अचानक बेपत्ता झाले.ते अद्यापपर्यंत सापडलेच नाहीत. त्यांना 2013 ला मयत घोषित करण्यात आले.

...म्हणून मुलांनीच केला आईला जाळण्याचा प्रयत्न

इंदूबाई यांना पतीच्या पीएफच्या रकमेतून 13 लाख रुपय मिळाले. दोन्ही मुलांना 9 लाख 84 हजार रुपये देऊनही उर्वरित पैशासाठी मुलांनी आईच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना काल रात्री घडली. गावच्या सरपंचांनी मदतीसाठी धाव घेऊन मुलाच्या हातातील पेटती काडी विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

या प्रकरणी दोन्ही मुलांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. काल दुपारी एक वाजेच्या सुमारास संतोष आणि नितीन हे दोघे कानडीमाळी येथे आले. नितीन याने आम्हाला पैसे देण्याचा बंदोबस्त कर नाहीतर तुझा खून करीन अशी धमकी दिली. यापूर्वी त्यांनी केलेल्या मारहाणीमुळे इंदूबाई यांनी घाबरून गावातील लोक गोळा करून तुम्हाला पैसे देऊन टाकते, असे सांगितल्यावर ते दोघे निघून गेले. त्यानंतर रात्री 7 वाजेच्या सुमारास पुन्हा ते दोघे घरी आले आणि पैशाची मागणी करू लागले. इंदूबाई यांनी आता माझ्याकडे पैसे नाहीत असे उत्तर दिले.

पैसे देण्यास नकार देताच नितीन याने संतोषला हातातील बाटलीतील पेट्रोल इंदूबाई यांच्या अंगावर टाक, आजच हिला जीवे मारु असे म्हटले. हे ऐकताच इंदुबाई यांनी तेथून भावजईच्या घराकडे पळ काढला. मात्र त्या दोघांनी पाठलाग करीत गावातील एका दुकानासमोर इंदूबाई यांना गाठले. संतोष याने अंगावर पेट्रोल टाकले, तर दुसरा मुलगा नितीन याने जीवे मारण्याच्या उद्देशाने काडीपेटीतील काडी पेटवून त्यांच्या अंगावर फेकणार तोच गावातील सरपंच अमर राऊत यांनी त्याच्या हातावर मारून काडी विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

इंदूबाई यांच्या तक्रारीवरून संतोष कुचेकर, नितीन कुचेकर या दोन्ही मुलांच्या विरोधात केज पोलिसांत खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 4, 2020, 9:09 PM IST
Tags: beedcrime

ताज्या बातम्या