Home /News /maharashtra /

Breaking: औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांच्या गटांत तुफान हाणामारी, 2 जण रक्तबंबाळ

Breaking: औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांच्या गटांत तुफान हाणामारी, 2 जण रक्तबंबाळ

ही घटना तंत्र निकेतन महाविद्यालयातील आहे. विद्यार्थ्यांच्या दोन विभागातील आपसातील कुरबुरीमुळे ही मारामारी झाल्याची चर्चा आहे.

औरंगाबाद, 29 जानेवारी : औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली असल्याची बातमी समोर येत आहे. या मारामारीत दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही घटना काल सायंकाळी घडली आहे. विद्यार्थ्यांच्या अशा मारामरीमुळे नागरिकांमध्ये आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. ही घटना तंत्र निकेतन महाविद्यालयातील आहे. विद्यार्थ्यांच्या दोन विभागातील आपसातील कुरबुरीमुळे ही मारामारी झाल्याची चर्चा आहे. दोन गटांनी एकमेकांना बेदम मारलं. यामध्ये 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मधे पडत विद्यार्थ्यांमधील वाद मिटवला. पण या प्रकरणाबद्दल अद्याप कुठलाही गुन्हा पोलिसांत दाखल करण्यात आलेला नाही. या हाणामारीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर होत आहे.  जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.  विद्यार्थ्यांच्या अशा भांडणामुळे औरंगाबादमध्ये पोलिसांचा धाक उरला का असाही प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान, पुण्यातही विद्यार्थ्यांच्या हाणामारीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आज एक धक्कादायक प्रकार घडला. पुण्यातील एक शाळेत वर्गातील सात मुलांनी मिळून एक विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे. मुख्य म्हणजे हा मुलगा शाळेत खुप अभ्यास करतो म्हणून त्याला या सात विद्यार्थ्यांनी मारहाण केली. वर्गात शिक्षकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत असल्यामुळं इतर मुलांना शिक्षक ओरडत असे, त्यामुळं वर्गातील विद्यार्थ्यांनी या हुशार मुलाला मारण्याचा कट रचला. दरम्यान, पोलिसांनी या सातही  अल्पवयीन विद्यार्थ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी 22 नोव्हेंबर रोजी एका 15 वर्षाच्या मुलाला मारहाण केली गेली होती. मात्र त्याच्या घरच्यांनी घाबरून त्यावेळी तक्रार केली नाही. आज या मुलाच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली, अशी माहिती वानवडी पोलिस स्थानकातील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान शाळेने अद्याप या सात मुलांवर कारवाई केलेली नाही. मारहाण करण्यात आलेल्या मुलाच्या आई-वडिलांनी असा दावा केला आहे की मुलाला पाईपने अमानुषपणे मारहाण करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित एक अतिशय हुशार विद्यार्थी होता आणि शिक्षकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायचा. म्हणून त्याला वर्गातल्या मुलांनी अमानुषपणे मारहाण केली. या प्रकरणी सात विद्यार्थ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.
Published by:Renuka Dhaybar
First published:

पुढील बातम्या