NASAमध्ये कंत्राटाचे आमिष; तोतया IPS ने अडीच कोटींना घातला गंडा

NASAमध्ये कंत्राटाचे आमिष; तोतया IPS ने अडीच कोटींना घातला गंडा

जगातील सर्वोच्च अंतराळ संशोधन संस्था 'नासा'मध्ये कंत्राटाचे आमिष दाखवून एका तोतया आयपीएस अधिकाऱ्याने सुमारे अडीच कोटींना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

  • Share this:

औरंगाबाद,11 जानेवारी: जगातील सर्वोच्च अंतराळ संशोधन संस्था 'नासा'मध्ये कंत्राटाचे आमिष दाखवून एका तोतया आयपीएस अधिकाऱ्याने सुमारे अडीच कोटींना गंडा घातल्याचे समोर आले आहे. एका आर्किटेक्टसह शहरातील सुमारे 24 जणांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने नाशिक येथून प्रमुख संशयिताला अटक केली आहे. अभिजित विजय पानसरे (वय-30, गोविंदनगर, रा. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अॅड. नितीन रायभान भंवर (रा.कॅनॉट प्लेस) याच्यांसह अभिजितच्या आई व बहिणीचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण?

20 ऑक्टोबर 2016 ते ऑक्टोबर 2017 या कालावधीत कॅनाट प्लेस येथे हा प्रकार घडला होता. रॉमध्ये आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून नासाचे कंत्राट देण्याचे आमिष दाखवत नाशिकचा तरुण व त्याच्या आई-बहिणीने शहरातील 24 जणांची सुमारे अडीच कोटींची फसवणूक केली. अभिजितला पोलिसांनी नाशिक येथून अटक झाली आहे.

ऑक्टोबर 2016 मध्ये अॅड. नितीन रायभान भंवरच्या माध्यमातून अभिजितने आर्टिकेक्ट शरद किसनराव गवळी (वय-38, रा. न्यू विशालनगर, गारखेडा परिसर) यांच्यासह शहरातील जवळपास 23 जणांशी संपर्क साधला होता.

अभिजित पानसरे याने गवळी आणि इतर काही जणांना आपली मे.सायन्स कुडोस नावाची संस्था असल्याचे सांगितले होते. या संस्थेमार्फत त्यांना अमेरिकन अवकाश संस्था 'नासा'कडून 'आरआरसी रिएक्टर ऑफ मेगा वॅट पावर' हा प्रकल्प तयार करण्याची परचेस ऑर्डर मिळाली आहे. 'नासा'सोबत करारनामा झाल्याची थाप मारली होती. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भांडवल कमी पडत असल्याने गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले होते. गुंतवणूकदारांचा विश्वास बसावा यासाठी अभिजितने त्यांना 'नासा'ची खोटे व बनावट कागदपत्रे, चेक, वर्क ऑर्डर दाखवली. या आमिषाला बळी पडून आर्टिकेक्ट शरद गवळी यांच्यासह इतर 23 जणांनी एकूण अडीच कोटीची गुंतवणूक अभिजितकडे केली. मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांनी त्यांची मूळ रक्कम आणि परतावा मागितला असता अभिजितसह अॅड. नितीन रायभान भंवर याने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणुकदारांनी पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांची भेट घेऊन दाद मागितली. आर्थिक गुन्हे शाखेने नाशिक येथून अभिजित पानसरेला अटक केली. ही कारवाई पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद, उपायुक्त मीना मकवाना, एसीपी डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

स्वत:ला सांगतो आयपीएस अधिकारी..

बीएस्सी उत्तीर्ण असलेला अभिजित स्वत:ला आयपीएस अधिकारी सांगतो. औरंगाबादमध्ये त्याने आयपीएस अधिकारी सांगून सध्या रॉमध्ये कार्यरत असल्याचे सांगितले होते. तशाच प्रकारे त्याने नाशिकमध्ये यापूर्वी फसवणूक केली आहे. तोतया आयपीएस असल्याचे सांगितल्याप्रकरणी त्याच्याविरद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या वडिलांचे निधन झालेले असून आई गृहिणी, तर लहान बहीण नाशिकमध्ये कायद्याचे शिक्षण घेते. या प्रकरणात त्या दोघींनाही आरोपी करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 11, 2020 10:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading