सहावीतल्या मुलाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या, महिलेने केला होता 'हा' आरोप

सहावीतल्या मुलाची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या, महिलेने केला होता 'हा' आरोप

सुरज नेहमी त्या किरणा दुकानात जायचा. मात्र, तो चोरी करणार नाही. तो संस्कारी आणि अभ्यासात अत्यंत हुशार होता.

  • Share this:

सचिन जिरे,(प्रतिनिधी)

औरंगाबाद,19 ऑक्टोबर: शेजारी राहणाऱ्या महिलेने शाळेत येऊन वर्गमित्रांसमोर 50 रुपये चोरल्याचा केलेला आरोप सहन न झाल्याने सहावीत शिकणाऱ्या एका मुलाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. सुरज जनार्धन क्षीरसागर (वय-12) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने औरंगाबादेतील शिवाजीनगर भागात रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली.

मिळालेली माहिती अशी की, सुरज हा सहावी वर्गात होता, तो गुरुवारी शाळेत जाण्यापूर्वी घराशेजारी असलेल्या किराणा दुकानात गेला होता. त्याची परीक्षा सुरू असल्याने तो बहिणीसोबत शाळेत गेला होता. मात्र, त्यानंतर किराणा दुकान चालवणारी महिला सरला धुमाळ यांना सुरजने गल्ल्यातील 50 रुपये चोरले असा संशय घेतला. सरला धुमाळ यांनी सुरजच्या शाळेत जाऊन त्याच्या वर्गमित्रांसमोर 'सुरजला पकडा त्याने माझे पैसे चोरले', असा आरोप केल्याने सुरजला अपमान झाल्याचे वाटले. तो शाळेतून निघून गेला. त्यानंतर तो परत शाळेत आला होता. परंतु महिला शाळेजवळच असल्याने तो परत पळून गेला आणि त्याने शिवाजी नगर येथील रेल्वेरुळावर रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. गारखेड्यातील कै.सौ. कलावती चव्हाण प्राथमिक विद्या मंदिर या शाळेचा सुरज विद्यार्थी होता.

या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस स्टेशनमध्ये आरोप करणारी महिला सरला धुमाळच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली आहे.

सुरज संस्कारी आणि अभ्यासात हुशार..

सुरजचे वडील जनार्धन क्षीरसागर यांनी सांगितले की, सुरज नेहमी त्या किरणा दुकानात जायचा. मात्र, तो चोरी करणार नाही. तो संस्कारी आणि अभ्यासात अत्यंत हुशार होता. महिलेने शाळेत जाऊन केलेला चोरीचा आरोप त्याला सहन झाला नाही. सुरजच्या शिक्षणासाठीच मी मेहनत करत होतो. आता तोच राहिला नाही.

माझा मुलगा परत आणून द्या, आईचा टाहो...

सुरज हा घरातील एकुलता एक मुलगा होता. तो गेल्याने त्याची आई भीमाबाई यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. ज्या मुलासाठी क्षीरसागर दाम्पत्य मोलमजुरी करत होते. ज्याला मोठे करण्याचे स्वप्न पाहून सुरजच्या शिक्षणासाठी शहरात आले होते. तोच काळजाचा तुकडा अशा दुर्दैवीरित्या सोडून गेल्याने या दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 'माझा मुलगा परत आणून द्या, असा टाहो आई फोडत आहे.

VIDEO: अमृता फडणवीसांनी जाहीर केला दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाचा निकाल, म्हणाल्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 02:49 PM IST

ताज्या बातम्या