मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी 55 आमदारांपैकी केवळ 10 जणच हजर, शेतकऱ्यांची मुलं लोकप्रतिनिधींवर भडकली

मराठवाड्यातल्या मोठ्या 11 धरणांपैकी बहुतेक धरणे पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. त्यामुळे मराठवाड्याला दुष्काळवाडा टँकरवाडा अशी विशेषणं लागली.

  • Share this:

औरंगाबाद, 02 फेब्रुवारी : मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी आज औरंगाबादेत मराठवाड्यातील आमदार, खासदारांची एक बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला मराठवाड्यातील 55 आमदारांपैकी केवळ 10 आमदार उपस्थित होते. यावेळी मराठवाड्याच्या पाणीप्रश्नी विद्यार्थी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी आणि मुलांनी आमदारांना धारेवर धरले.

मराठवाड्याचा पाणीप्रश्न औरंगाबाद इथल्या हॉटेल अजिंठा अॅम्बेसेडरमध्ये आमदारांची बैठक बोलवली होती. मराठवाड्यातल्या 55 आमदारांपैकी या बैठकीला केवळ 10 आमदार उपस्थित होते. यातील नऊ आमदार भाजपचे तर सेनेकडून संजय शिरसाठ उपस्थित होते. पण काही वेळातच संजय शिरसाठ यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. त्यामुळे या बैठकीत विद्यार्थ्यांनी, शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त महिला आणि मुलांनी आमदारांना धारेवर धरलं. विशेष म्हणजे, केवळ आमदारच नाही तर या बैठकीला मराठवाड्यातल्या 9 खासदारांपैकी एकही खासदार उपस्थित नव्हता.

या बैठकीला कोणत्या आमदारांनी दांडी मारली ?

मराठवाड्यातील दिग्गज आमदारांपैकी लातूर जिल्ह्यातील अमित देशमुख, धीरज देशमुख, संभाजी पाटील, मंत्री संजय बनसोडे, उस्मानाबाद जिल्ह्यातील डॉ. तानाजी सावंत, राणा जगजितसिंह पाटील,  परभणी जिल्ह्यातील डॉ. राहुल पाटील, बीड जिल्ह्यातील प्रकाश सोळुंके, धनंजय मुंडे, सुरेश धस, जालना जिल्ह्यातील मंत्री राजेश टोपे, बबनराव लोणीकर, नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाण, औरंगाबाद जिल्ह्यातील मंत्री अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, अंबादास दानवे अनुपस्थित होते. याशिवाय जे मंत्री दोनदा-तीनदा आमदार झालेत, त्यातील अनेक आमदार उपस्थित नव्हते.

या बैठकीला संयोजक भाजपचे आमदार प्रशांत बंब, हरिभाऊ बागडे, अतुल सावे, सुरजितसिंह ठाकूर, अभिमन्यू पवार, संतोष दानवे, मेघना बोर्डीकर, रमेश पवार, रामराव पाटील रातोळीकर हे भाजपचे ९ आमदार तर शिवसेनेचे एकमेव संजय शिरसाठ असे एकूण १० आमदार बैठकीला उपस्थित होते.

मराठवाड्यातल्या मोठ्या 11 धरणांपैकी बहुतेक धरणे पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. त्यामुळे मराठवाड्याला दुष्काळवाडा टँकरवाडा अशी विशेषणं लागली. प्रत्येक निवडणुकीमध्ये मराठवाड्याचा पाणी प्रश्न प्रचार केला गेला. महाविकास आघाडी सरकारनं मराठवाड्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा म्हणून मराठवाडा वॉटरग्रीडची योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केली. पण या योजनेला देखील महाविकास आघाडी कात्री लावण्याच्या तयारीत आहे. यापुढे मुंबईत एक बैठक बोलावली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून येत्या अर्थसंकल्पात मराठवाड्याच्या प्रश्न तरतूद करण्याची  सरकारला विनंती केली जाणार असल्याचं या बैठकीला उपस्थित आमदारांनी सांगितलं.

खरंतर मराठवाड्याचा पाणीप्रश्न ही बैठक होती. मात्र, केवळ भाजपचे आमदार या बैठकीला उपस्थित राहिल्याने मराठवाडा वॉटर ग्रील या योजनेच्या विरोधाच्या पायाभरणीसाठी ही बैठक होती का हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

मराठवाड्यातल्या पाणी प्रश्न या बैठकीला सर्वपक्षीय आमदारांनी उपस्थिती लावून गरजेचं होतं. असं झालं असतं तर सरकारवर एक दबाव निर्माण झाला असता ।ज्यामुळे सरकार गंभीर झालं असतं पण यातही राजकारण पाहायला मिळालं. जोपर्यंत मराठवाड्यातले सर्वपक्षीय आमदार एकत्र येऊन मराठवाड्याच्या पाणीप्रश्नी लढा देत नाहीत तोपर्यंत मराठवाडा टँकरवाडा दुष्काळवाडा अशी विशेषणं मराठवाड्याचे नशिबी असणार हे नक्की.

त्यामुळे आमदार हो, गंभीर व्हा अन्यथा याचे परिणाम आज असे बैठकीत पाहायला मिळाले. तसंच उद्या रस्त्यावर पाहायला मिळाले तर नवल वाटायला नको.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2020 06:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading