औरंगाबाद, 24 ऑक्टोबर : राज्य विधानसभेच्या 288 जागांपैकी मराठवाड्यातील 46 जागांचे निकाल लागल आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांनी धक्कादायक पराभव केला. राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांना 1 लाख 21 हजार 186 मते तर भाजपच्या पंकजा मुंडे यांना 90 हजार 418 मते मिळाली. धनंजय मुंडे यांचा 30 हजार 768 मतांनी विजय. तर, भाकेरमधून अशोक चव्हाणही विजयी झाली. दुसरीकडे सर्वात मोठी लढत असलेल्या कन्नडमध्ये रावसाहेब दानवे यांचे जावई आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचा पराभव झाला.
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघातून शिवसेना-भाजप महायुतीचे प्रदीप जैस्वाल यांचा विजय केवळ घोषित करणे बाकी आहे. जैस्वाल यांनी 22व्या फेरीअखेर 13 हजार 414 एवढी आघाडी घेतलेली असून केवळ एक फेरी मतमोजणी शिल्लक आहे. तर, दुसरीकडे औरंगाबाद पूर्वमधून राज्यमंत्री अतुल सावे यांना पहिल्या फेरीत एमआयएमच्या गफ्फार कादरी यांनी पिछाडीवर टाकले होते. मात्र त्यानंतर अतुल सावे यांनी विजयी आघाडी घेत विजय मिळवला. तर लातूरच्या दोन्ही जागांवर देशमुख कुटुंबियांन वर्चस्व राखत विजय मिळवला आहे. दरम्यान शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांचाही कॉंग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी विजय मिळवला.
दिग्गजांचा झाला पराभव
मराठवाड्यात पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर, संभाजी पाटील-निलंगेकर, तानाजी सावंत, अतुल सावे हे पाच मंत्री निवडणुकीच्या रिंगणात होते. यातील पंकजा मुंडे, अर्जुन खोतकर, जयदत्त क्षीरसागर आणि हर्षवर्धन जाधव यांचा दारूण पराभव झाला. त्यामुळं सेने-भाजपला मराठवाड्यात मोठा फटका बसला आहे. परळीमधून पंकजा मुंडेचा धनंजय मुंडेंनी 30 हजारांनी मतांनी पराभव केला.
औरंगाबदमध्ये शिवसेनेचे वर्चस्व कायम
औरंगाबाद जिल्ह्यातील विजयी उमेदवार
कन्नड - उदयसिंह राजपूत शिवसेना
वैजापूर - रमेश बोरणारे शिवसेना
पैठण - संदीपान भुमरे शिवसेन
सिल्लोड - अब्दुल सत्तार शिवसेना
औरंगाबाद मध्य - प्रदीप जैस्वाल शिवसेना
औरंगाबाद पूर्व - अतुल सावे भाजप
औरंगाबाद पश्चिम - संजय शिरसाट शिवसेना
फुलंब्री - हरिभाऊ बागडे भाजप
गंगापूर - प्रशांत बंब भाजप
औरंगाबाद 6 जागी शिवसेना तर 3 जागी भाजप विजयी
2014च्या तुलनेत एमआयएमला तोटा
मराठवाडामध्ये एमआयएम आणि वंचित फॅक्टर कमाल करेल अशी अपेक्षा होती, मात्र तसे काही झाले नाही. 2014च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमनं औरंगाबाद मध्यमध्ये इम्तियाज जलील यांनी 2014मध्ये आमदारकी जिंकली होती. मात्र 2019मध्ये जलील लोकसभेत गेले. त्यामुळं एमआयएमला औरंगाबादमध्ये मोठा फटका बसला. औरंगाबादमध्ये एकही जागा एमआयएमला जिंकता आली नाही. औरंगाबद पूर्वमधून डॉ. गफ्फार कादरी हे पहिल्या फेरीत आघाडीवर होते, मात्र अतुल सावे यांनी बाजी मारली. 2014च्या तुलनेनं भाजपची 1 तर सेनेची 1 जागा वाढली आहे. कॉंग्रेसनं 9 जागांवर विजय कायम ठेवला आहे.