महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमाभागात 8 मार्चला पुन्हा एकदा होणार मराठीचा जागर

महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमाभागात 8 मार्चला पुन्हा एकदा होणार मराठीचा जागर

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेच्या वतीने 8 मार्च 2020 रोजी महिला दिनानिमित्त बेळगावमध्ये पहिले राज्यस्तरीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

  • Share this:

कोल्हापूर,17 फेब्रुवारी: अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेच्या वतीने 8 मार्च 2020 रोजी महिला दिनानिमित्त बेळगावमध्ये पहिले राज्यस्तरीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. बेळगावमध्ये शिवालय येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ॲड.सुधीर चव्हाण हे होते.

मराठी संमेलन मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात येणार असून 8 मार्च सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत एकूण चार सत्रात हे संमेलन पार पडणार आहे. पहिल्या सत्रात उदघाटन व अध्यक्षीय भाषण होणार असून दुसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन संपन्न होणार आहे. तिसऱ्या सत्रामध्ये मान्यवर वक्त्यांच्या उपस्थितीत "मराठी भाषेसाठी माध्यमांचे योगदान " या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार असून चौथे सत्र मनोरंजनातून प्रबोधन असे असणार आहे.

यावेळी बेळगाव परिसर व तालुक्यात संपन्न होणाऱ्या विविध ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाबाबत चर्चा करण्यात येऊन बेळगाव परिसरात असे संमेलन होत नसल्यामुळे मराठी भाषिकांसाठी एक पर्वणी उपलब्ध करून देण्यासाठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठीस महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांना आमंत्रण देण्याचे निश्‍चित करण्यात आले.

या बैठकीला कार्याध्यक्ष महादेव चौगुले, जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष डी.बी. पाटील, राज्याध्यक्ष रवींद्र पाटील, सचिव रणजीत चौगुले, सहसचिव संजय गुरव, संजय मोरे ,एम.वाय. घाडी, संजय गौंडाडकर, मोहन पाटील, मोहन अष्टेकर, एल.पी. पाटील, संदिप तरळे, गणेश दड्डीकर आधी सदस्य उपस्थित होते.

विशेष म्हणजे यापूर्वीही येळूर, कुद्रेमनी या गावांमध्ये मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्यात आली होती पण या संमेलनांना कर्नाटक प्रशासनाने परवानगी दिली नव्हती पण आता बेळगाव मधल्या या राज्यस्तरीय संमेलनाला प्रशासन परवानगी देतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सीमाभागात आजही मराठी भाषिक मराठी अस्मिता जपत आहेत त्यामुळे अशा साहित्य संमेलनामुळे सीमा भागात आजही मराठीचा जागर केला जातो हेही विशेष आहे.

First published: February 17, 2020, 8:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading