Home /News /maharashtra /

शिवसेनेनेनं रद्द केलेला शरद पोंक्षे यांचा `अथांग सावरकर' कार्यक्रम आता भाजप करणार

शिवसेनेनेनं रद्द केलेला शरद पोंक्षे यांचा `अथांग सावरकर' कार्यक्रम आता भाजप करणार

'मराठी भाषा दिनी' मनोरंजन होत नसल्याचं कारण दाखवून शिवसेनेने रद्द केलेला अभिनेते शरद पोंक्षे यांचा 'अथांग सावरकर' कार्यक्रम भाजपने ठाण्यात आयोजित केला आहे.

ठाणे, 12 फेब्रुवारी : ठाण्यात भाजपतर्फे मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमातच भाजपचे शहराध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी 'अथांग सावरकर' कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला. 'मी नथुराम गोडसे बोलतोय' नाटकामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिनेते शरद पोंक्षे यांचा हा कार्यक्रम शिवसेनेनं नाकारला असल्याची टीका भाजपने केली आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता भाजपतर्फे ठाण्यात डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम होईल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील शिवसेनेचं प्रेम हे बेगडी आहे. शिवसेनेचे दाखवायचे दात व खायचे दात वेगवेगळे असून, आम्ही हिंदुत्ववादी असल्याचा पोकळ आव आणला जात आहे. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमामुळे व कॉंग्रेसच्या संभाव्य आक्षेपाच्या भीतीमुळे शिवसेनेला सावरकरांपासून दूर राहावं लागत आहे. त्यामुळे करमणुकीचं कारण दाखवून 'अथांग सावरकर' कार्यक्रम रद्द करण्यात आला, अशी कठोर टीका आमदार डावखरे यांनी केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रखर विचार असलेला `अथांग सावरकर'ची तुलना मनोरंजनात्मक कार्यक्रमाशी करणं अपमानास्पद आहे, अशी भाजपची भूमिका आहे. 'शिवसेना सरकारचा यासाठी प्रत्येक सावरकरप्रेमी निषेध करीत आहे. सावरकरांबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असे छातीठोकपणे सांगणाऱ्या शिवसेनेकडून सावरकरांच्या विचारांचा प्रसार करणारा `अथांग सावरकर' कार्यक्रम रद्द होतो, यावरुन शिवसेनेचे `खरे' सावरकरप्रेम दिसून येते', असे निरंजन डावखरे यांनी सांगितले.
Published by:Manoj Khandekar
First published:

पुढील बातम्या