मुंबई,15 मे- आझाद मैदानावर वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाबाबत मराठा समाजाच्या विद्यार्थांचं आंदोलन सुरु आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आणि मराठा मोर्चाचे समन्वयकांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची बुधवारी दुपारी 2 वाजता भेट घेतली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि डॉ.तात्या लहानेही उपस्थित होते. परंतु बैठक फिस्कटली आणि बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न चिघळला आहे. सरकारने या मराठा विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने वैद्यकीय प्रवेशाला सात दिवसांची स्थिगिती दिली आहे. एक आठवड्याची मुदतवाढ मिळाल्यानंतरही आझाद मैदानात विध्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे. आम्हाला कोणतीही लेखी बाब मिळाली नाही, फक्त आश्वासन मिळालं आहे. आमचं आंदोलन सुरुच राहणार, असं विद्यार्थांनी सांगितलं आहे. सरकार अध्यादेश का काढत नाही, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी 2 वाजता पीजी मेडीकल मराठा आरक्षण बैठक झाली. याबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. कालच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज विद्यार्थ्यांची मतं ऐकण्यासाठी आजची बैठक बोलवली होती. सरकार कोणाचंही नुकसान होऊ देणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
25 तारखेपर्यंत मुदतवाढ...
सरकारने आता वैद्यकीय प्रवेशासाठी अकरा दिवसांची मुदत वाढवण्यासाठी सरकारने परिपत्रक काढलं आहे. ऑनलाईन प्रवेशाच्या वेबसाईटवर सरकारकडून हे परिपत्रक टाकण्यात आलं आहे. त्यामुळे वैद्यकीय आणि दंत प्रवेश प्रक्रियेला 25 तारखेपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या शैक्षणिक सवलतीबाबत विचार करण्यासाठी मुंबईतील शिवाजी मंदिरात मराठा मोर्चाची राज्यस्तरीय बैठकही पार पडली. महाराष्ट्रात 30 नोव्हेंबर 2018 रोजी मराठा आरक्षण लागू करण्यात आलं. मात्र नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार या आरक्षणाचा लाभ मेडिकल विभागातील कोणत्याच विद्यार्थ्याला घेता येत नाही. कारण मराठा आरक्षण लागू होण्याआधी 13 नोव्हेंबर रोजी मेडिकलचे नोटिफिकेशन आल्याने त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. सुप्रीम कोर्टानेही नागपूर खंडपीठाचा हा निर्णय कायम ठेवला आहे.
VIDEO: 'तू झक्कास दिसतेस' म्हणताच तरुणीने युवकाला चपलेनं धुतलं