"मोर्चा काढून काय निष्पन्न होणार? संसदेत विषय उचलून धरावा लागेल": अशोक चव्हाण
"मोर्चा काढून काय निष्पन्न होणार? संसदेत विषय उचलून धरावा लागेल": अशोक चव्हाण
Ashok Chavan on Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे आक्रमक झाले असून मोर्चा काढण्याचंही जाहीर केलं आहे. यावर आता अशोक चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नांदेड, 13 जून: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरुन मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यासोबतच खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje) यांनीही आक्रमक होत मोर्चा काढण्याचं म्हटलं आहे. मराठा आरक्षणासाठी विधानभवनापर्यंत मोर्चा काढण्याचा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे. तत्पूर्वी कोल्हापुरातही मोर्चा काढण्यात येणार आहे. या प्रकरणावर आता अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी प्रतिक्रिया देत संभाजीराजेंना सवाल केला आहे.
मोर्चा काढून काय निष्पन्न होणार?
मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढून काय निष्पन्न होणार त्यापेक्षा ज्या-ज्या पक्षाचे खासदार संसदेत आहेत तिथे त्यांनी आवाज उठवला तर फायदा होईल अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. 16 जून रोजी खासदार संभाजी महाराज यांच्या नेतृत्वात कोल्हापुरमध्ये काढण्यात येणाऱ्या मोर्चाबाबत विचारले असता अशोक चव्हाणांनी ही प्रतिक्रिया दिली.
...तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो
मराठा आरक्षण व्हावे अशी सरकारचीही इच्छा आहे त्यामुळे मोर्चा नेमका कोणाच्या विरोधात आहे असा सवाल त्यांनी उपस्थीत केला. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आता सर्व अधिकार केंद्राचे आहेत. आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली आहे, त्यांनी भूमिका घेतली तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो असे अशोक चव्हाण म्हणाले.
संभाजीराजेंनी दिल्लीत मोर्चा काढावा: संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं, संभाजीराजे यांनी दिल्लीत मोर्चा काढावा. दिल्लीत एक मराठा लाख मराठा ताकद दाखवावी. मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारच ठाम भूमिका घेऊ शकतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेऊन हात जोडून विनंती केली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घ्यायचा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.