Maharashtra Band : महाराष्ट्र बंदला जाळपोळ,तोडफोडीचे गालबोट !

Maharashtra Band : महाराष्ट्र बंदला जाळपोळ,तोडफोडीचे गालबोट !

हिंसक आंदोलनाचा सर्वात मोठा फटका पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि लातूरला बसला. एक्सप्रेसवेसह अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. औरंगाबाद-नागपूरमध्ये रेलरोको करण्यात आला.

  • Share this:

मुंबई, 09 आॅगस्ट : मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. पण सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला दुपारनंतर हिंसक वळण लागलं. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तर औरंगाबादमध्ये वाळूज एमआयडीसीमध्ये तीन कंपन्यांची तोडफोड करण्यात आली. तसंच कंटनेरही पेटवून देण्यात आला. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना यावेळी हवेत गोळीबार करावा लागला.  एकीकडे मराठा समन्यव समितीने आंदोलन शांततेत पार पाडावे अशी भूमिका घेतली पण दुसरीकडे ठिकठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ करून महाराष्ट्र बंदला गालबोट लावण्यात आलं.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गानं राज्यव्यापी बंद पुकारण्याचं आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलं होतं.  त्या आवाहनाला साद देत आज सकाळी राज्यभरात ठिकठिकाणी बंद पुकारण्यात आला. घोषणाबाजी सोडली तर सुरूवातीला आंदोलन ठरल्याप्रमाणे शांततेत सुरू होतं. मात्र दुपारनंतर आंदोलनाला अचानक हिंसक वळण मिळालं.  हिंसक आंदोलनाचा सर्वात मोठा फटका पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि लातूरला बसला. एक्सप्रेसवेसह अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला.  औरंगाबाद-नागपूरमध्ये रेलरोको करण्यात आला. हिंगोली लातूरमध्ये जाळपोळ करण्यात आली. काही ठिकाणी पत्रकार आणि आमदारांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान न करण्याच्या निर्धारानं पुकारण्यात आलेल्या बंदला या घटनांमुळं गालबोट लागल्याचं दिसतंय.

काँग्रेस आमदारांच्या गाडीवर दगडफेक

घडाळ्याच्या काटा जसजसा पुढे सरकू लागला तसंतसं मराठा आंदोलन तापत गेलं आणि शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी गालबोट लागलं. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलकांनी दगडफेक केली. तिकडे लातूरमध्येही मराठा आंदोलनाला गालबोट लागलं. काँग्रेस आमदार त्र्यंबक भिसेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्याचप्रमाणे औरंगाबादेतही वाळूंज एमआयडीसीत आंदोलकांनी टँकर फोडला. नांदेडमध्ये उमरी स्टेशनवर आंदोलकांनी तोडफोड केल्यानं रेल्वेचं मोठं नुकसान झालं.. तसंच नाशकातही आंदोलकांच्या 2 गटांमध्ये हमरीतुमरी झाली.

जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक

पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलकांनी दगडफेक केली. कार्यालयाच्या गेटवर चढून आंदोलकांनी आतमध्ये प्रवेश केला. सर्व आंदोलक जवळपास 18 ते 19 वयोगटातील होते. भिंतीवर चढून आंदोलकांनी दिवे फोडले.

सात तास पुणे-मुंबई महामार्ग बंद

पुण्यात आंदोलकांनी चांदनी चौकच जाम केल्यानं, मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक पुरती विस्कळीत झाली होती. चांदनी चौकात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर आंदोलकांची चांदनी चौकात पळापळ सुरू झाली. सध्या दरम्यान वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात आली.

राज्यव्यापी बंदच्या निमित्तानं आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केल्यामुळं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे जवळपास 7 तास ठप्प होता तर पुणे सोलापूर मार्ग देखील आंदोलकांनी रोखून धरला होता. बैलगाड्या आणून आंदोलकांनी पुणे-सोलापूर महामार्ग रोखून धरला होता.

तर तिकडे पुण्याच्या हिंजवडी भागातील आयटी कंपन्यांमध्ये आंदोलकांनी जबरदस्तीनं घुसखोरी केली. यामुळे नाईलाजानं आयटी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता धरावा लागला.

औरंगाबादेत हवेत गोळीबार

औरंगाबादच्या वाळुंज एमआयडीसीत आंदोलकांनी 3 ते 4 कंपन्यांची तोडफोड केली. यावेळी कंटनेरही पेटवण्यात आला. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. यानंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली.

नांदेडमध्ये रेल्वेची तोडफोड

नांदेडमध्ये उमरी रेल्वे स्टेशनवर आंदोलकांनी मोठी तोडफोड केली. यामुळे रेल्वे स्टेशनचं मोठं नुकसान झालंय.रेल्वे रोखण्यासाठी आंदोलक स्थानकात घुसले.

रेल्वे अडकल्या

मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत औरंगाबाद- जालना रेल्वेमार्ग आडवला होता. त्यामुळं महत्त्वाच्या एक्स्प्रेस वे बराच वेळ खोळंबल्या होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. तर तिकडे नागपुरात मानकापूर रिंग रोड परिसरातही मराठा समजाच्या आंदोलकांनी रेलरोको करण्याचा प्रयत्न केला. आरपीएफच्या जवानांनी आंदोलकांना रूळावरून बाजुला केलं. नाहीतर मोठा अनर्थ घडला असता.

हिंगोलीत स्कूल बस पेटवली

हिंगोलीत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मागणी करीता पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. सेनगावात शाळेच्या प्रागणात असलेल्या मिनी स्कूल बस  आणि एका खाजगी वाहनाला जाळण्यात आलं, तर दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली. शहरातील बाजारपेठेत कडकडीत बंद होता.

इंटरनेट बंद

दरम्यान अफवांचं लोण आणि हिंसा थोपवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी इंटरनेट बंद ठेवण्यात आलं. पुणे जिल्ह्यातील 8 तालुके, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, नवी मुंबई, अहमदनगर आणि यवतमाळ या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद होती.

आंदोलनात शुभमंगल सावधान

अकोल्यात आज सकाळपासूनच बंद दिसून आला. आंदोलन, रॅली आणि काही ठिकाणी टायर जाळून रास्ता रोकोच्या घटनांनी बंद पाहायला मिळतोय. परंतु, अकोल्यातील अकोट इथ आंदोलनातच विवाह संपन्न झाल्यानं आगळंवेगळं आंदोलन पाहायला मिळालं, मराठा समाजातील वधू-वराने चक्क आंदोलनात आपला विवाह केलाय. ज्या आंदोलनस्थळी सरकारकडे मागणी केली जात आहे, तिथेच प्रत्येक आंदोलकांनी वधू-वरांना भावी आयुष्यांसाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद देत होते.

First published: August 9, 2018, 7:10 PM IST

ताज्या बातम्या