नवी मुंबई, २४ जुलैः मराठवाड्याच्या सकल मराठा मोर्च्याने सुरू केलेल्या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. आज नवी मुंबईत सकल मराठा समाजाची बैठक वाशीतील माथाडी भवनात पार पडली. या बैठकीत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, रायगड येथून मोठ्या संख्येने मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत उद्या नवी मुंबई बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा क्रांती मोर्चाच्या तिसऱ्या दिवशीही आंदोलन तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर आंदोलन अधिक हिंसक झाले. काकासाहेबांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या खासदार चंद्रकांत खैरे यांना मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. अंत्यसंस्कारच्या ठिकाणावरून खैरे यांना पिटाळण्यात आलं. कार्यकर्त्यांचा रोष पाहता चंद्रकांत खैरे यांनी तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या प्रकारामुळे मराठा क्रांती मोर्चा आता आपल्या मागण्यांसाठी आणखीनच आक्रमक होत चालला आहे असं म्हणायला हरकत नाही.
दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर सातारा आणि सांगली तिन्ही जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झाला असून कोल्हापूरमध्ये आजपासून मराठा समाजाने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर शहरातली अनेक दुकानं व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद केली असून एसटीची सेवा ही तुरळक प्रमाणामध्ये सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत सात एसटी गाड्यांवर दगडफेक करण्यात आलीय तर सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यातही अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आले आहेत.
मराठा मोर्चा आंदोलनाकडे आतापर्यंतचे सर्वात शिस्तबद्ध आंदोलन म्हणून पाहिले जात होते. मात्र आता या आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून राज्यभर याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. आज महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आली आहे. या बंदमधून मुंबई, पुणे, सातारा, सोलापूरला वगळण्यात आले असले तरी तशी परिस्थिती मात्र त्या राज्यांमध्ये दिसत नाही. बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजातील प्रत्येक व्यक्ती मूक मोर्च्यात ‘एक मराठा लाख मराठा’ अशी साद घालत रस्त्यावर उतरला होता. मराठवाड्यात सकल मराठा मोर्चाच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनात सोमवारी काकासाहेब शिंदे (वय २८) या तरुणाने गंगापूर तालुक्यातील कायगाव टोक येथे पुलावरील गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारली. यात काकासाहेब शिंदे याचा मृत्यू झाला. त्यामुळे गंगापूर तालुक्यात तणावाचे वातावरण आहे. काकासाहेब शिंदेच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
हेही वाचाः
पुन्हा एका मराठा कार्यकर्त्याने नदीत टाकली उडी, गंभीर जखमी
VIDEO : मराठा कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत खैरेंना शिवीगाळ आणि धक्काबुक्की
मराठा मोर्चातील काकासाहेब शिंदे मृत्यू प्रकरणी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक सक्तीच्या रजेवर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gangapur latest updates, Maharashtra bandh, Maratha kranti morcha, Mumbai, Mumbai band, Navi mumbai, Reservation demand, नवी मुंबई, मराठा आंदोलन, मराठा क्रांती मोर्चा, मुंबई बंद, सकल मराठा मोर्चा