कांदा आयातीच्या मुद्द्यावरून 'मराठा क्रांती मोर्चा'चा सरकारला थेट इशारा

कांदा आयातीच्या मुद्द्यावरून 'मराठा क्रांती मोर्चा'चा सरकारला थेट इशारा

मराठा क्रांती मोर्चाने कांदा प्रश्नाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • Share this:

मुंबई, 7 डिसेंबर : 'कांद्याचे भाव वाढले आहेत तर ओरड होत आहे. पण शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार याचा विचार कोणी करत नाही. शेतमाल आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे आयात केलेला कांदा जेएनपिटी बंदरात उतरवू देणार नाही. राज्याभरात शेतकरी रस्त्यावर उतरू आणि आयात केलेला कांदा विकू देणार नाही,' असं म्हणत मराठा क्रांती मोर्चाने कांदा प्रश्नाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.

'सरकारचा कांदा आयात करण्याचा विचार आहे. 15 दिवसात कांदा आयात केला जाईल आणि त्याच दरम्यान आपल्या शेतातील कांदा बाजारात येणार आहे. यामुळे भाव घसरले तर शेतकऱ्याचं नुकसान होईल,' असं म्हणत सरकारकडून होणाऱ्या कांदा आयात निर्णयाविरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे.

मराठा क्रांती मोर्चा चा सरकारला इशारा

'परदेशी कांद्याची होणारी आयात शेतकऱ्यांसाठी घातक आहे. जानेवारीत परदेशी कांदा राज्यात आल्यास शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव कोण देणार? राज्यात नवे कांदा उत्पादन येणार असताना सरकार कांदा आयात का करू पाहते? सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा शेतकऱ्याच्या आर्थिक संकटात वाढ होणार आहे. परदेशी आयात कांदा विकू देणार नाही,' असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने सरकारला दिला आहे.

दरम्यान, दररोजच्या जेवणात अत्यावश्यक असणाऱ्या कांद्यांचे भाव सध्या आकाशाला भिडले आहेत. काद्यांने शंभरी पार केल्याने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. त्यामुळे जेवणातून कांदाच बाहेर गेलाय. या कांद्याच्या दरात आणखी 3 महिने कोणतीही घट होण्याची सूतराम शक्यता नाही, देशभरातल्या कांदा उत्पादक भागात सलग महिनाभर झालेल्या अतिवृष्टीनं खरीप कांद्याचं मोठं नुकसान झालंय. रब्बी कांद्याचा साठा संपत आलाय, नवा कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात यायला आणखी 3 महिने वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतरच कांद्याच्या दरात दिलासा मिळेल अशी शक्यता आहे. कांद्यावरील स्टॉक लिमिट किंवा कांदा आयात करुन देशातली गरज पूर्ण होणार नाही अशी माहिती कांदा बाजाराचे विश्लेषक दिपक चव्हाण यांनी दिली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 7, 2019, 3:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading