बीड, 05 जून: अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण (Maratha Reservation) घटनाबाह्य असल्याची टिप्पणी केली आहे. न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मोठ्या प्रमाणात राजकारणही करण्यात आलं आहे. यानंतर आता बीडमधून (Beed) मराठा क्रांती संघर्ष मोर्चाला (Maratha Kranti Sangharsh Morcha) सुरुवात झाली आहे.
आज सकाळपासूनचं मराठा बांधव बीडमधील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल याठिकाणी एकत्र येत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासोबतच अन्य मागण्यांसाठी आज दुपारपासून बीडमधून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. हा मोर्चा शहरातील प्रमुख रत्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकणार आहे. विशेष म्हणजे या मोर्चाला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एकीकडे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना, अशा प्रकारे मराठा बांधव एकत्र येत असल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. मोर्चाची परवानगी नाकारली तरी, कसल्याही परिस्थिती मोर्चा निघणारचं असं शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे बीडमधील या मोर्चाचं नेमकं काय होतंय, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.
हे ही वाचा- Maratha Reservation: मराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय
हा मोर्चा बोलका असेल, सरकारच्या अपयशाची पोलखोल करणारा असेल, असंही विनायक मेटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. मोर्चाला विरोध करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला होता. अशोक चव्हाणांच्या नादी लागून एक दिवस काँग्रेसचं विसर्जन होईल, असंही मेटे म्हणाले होते
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.