'मराठा समाजाची बदनामी करण्याचा डाव'; रखडलेल्या 11 वी प्रवेशाबाबत भूमिका स्पष्ट करून अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने तात्पुरती स्थगिती दिल्याने 11 वी प्रवेशही रखडले आहेत. त्याबाबत अशोक चव्हाण यांनी भूमिका स्पष्ट केली.

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने तात्पुरती स्थगिती दिल्याने 11 वी प्रवेशही रखडले आहेत. त्याबाबत अशोक चव्हाण यांनी भूमिका स्पष्ट केली.

  • Share this:
    मुंबई, 2 नोव्हेंबर : मराठा समाजाला मुद्दाम बदनाम करण्याचा डाव आहे. ओबीसी आणि मराठा वाद  हे काही पक्षांचं राजकीय षड्यंत्र काही पक्षाचे आहे, असा आरोप करत अशोक चव्हाण यांनी 11 वी च्या थांबलेल्या प्रवेशप्रक्रियेविषयीही भूमिका जाहीर केली. माजी मुख्यमंत्री आणि सध्या सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले चव्हाण राज्य सरकारच्या मराठा आरक्षणविषयक असलेल्या उपसमितीचे अध्यक्ष आहेत. "मराठा आरक्षणाला कोर्टात तात्पुरता स्टे मिळाला. ही काही माझी नामुश्की नाही. आरक्षणाला सरकारने नाही, कोर्टाने स्थगिती दिली आहे. आणि आता सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. आज कोर्टाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. सरन्यायाधीशांनी आरक्षणाचा विषय घटनापीठासमोर लवकरात लवकर मांडला जाईल, असं सांगितलं आहे. आता सरकारला विरोध करण्यापेक्षा आणि आंदोलन करण्यापेक्षा कोर्टात मदत करावी", असं चव्हाण यांनी सांगितलं. राज्य सरकारची कोर्टापुढे मागणी मराठा आरक्षणासाठी घटनापीठ स्थापन करा आणि त्या घटनापीठासमोर मराठा आरक्षणाच्या अंतरिम स्थगितीविषयी सुनावणी करावी, अशी मागणी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. त्याविषयी अशोक चव्हाण यांनी माहिती दिली. राज्य सरकारच्या वतीने या मागणीसाठी सोमवारी तिसऱ्यांदा सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज सादर केला. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. 11 वी चे रखडलेले प्रवेश पूर्ण करावे मराठा आरक्षणाला स्थिगिती मिळाल्यामुळे अकरावीची प्रवेशप्रक्रियासुद्धा अडकली. यावर चव्हाण यांनी भूमिका स्पष्ट केली. "मराठा आरक्षण कोर्टात आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया थांबवणं योग्य नाही. ती तातडीने पूर्ण केली पाहिजे. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून कॅबिनेटने तातडीने निर्णय घ्यावा ही आमची भूमिका आहे", असं चव्हाण म्हणाले. मराठी आरक्षणाबद्दल कारण नसताना वाद निर्माण केला जात आहे. त्यामागे काही राजकीय पक्ष आहेत. मराठा समाजाची बदनामी करण्याचा हा डाव आहे. मराठा आरक्षण देताना इतारांच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही, असंही ते म्हणाले.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published: