मुंबई, 25 मार्च : ऐन मार्च महिन्यात पडलेल्या पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे. पुण्यात मेघ गर्जनेसह पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं. कोथरुड, कर्वेनगर, सिंहगड रोड या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही पुणेकरांना गारवा अनुभवायला मिळाला.
दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला. आजरा, चंदगड या भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढलं. मात्र या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. ज्वारी, आंबा, काजू या पिकांना चांगलाच फटका बसणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, नांदुरा आणि बुलडाणा शहर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. अर्धा तासापासून जास्त काळ झालेल्या पावसाने रस्त्यांवरून चांगलंच पाणी वाहायला लागलं होतं.
नगर तालुक्यात आवकाळी पाऊसाने फळबागाचे नुकसान झालं आहे. खडकी, खंडाळा, सारोळा कासार, अकोळनेर, वाळकी, बाबूर्डी बेंद, सारोळा बद्दीसह परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने मोठ्या प्रमाणात तोडणीला आलेला संत्रा गळाला आहे. 50 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील संत्रा बागांना फटका बसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
हेही वाचा-'मोदीजी काहीतरी मागत आहेत... ऐकणार ना? देवेंद्र फडणवीसांनी घातली भावनिक साद
दरम्यान, राज्यात मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासात वादळी वारासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या बहुतेक भागात कमाल पारा तापमान 35 अंश सेल्सिअस ते 40 अंश सेल्सिअस इतका राहिला आहे. तापमानाचा पारा दिवसभर वाढत आहे, पण त्याचवेळी रात्री वादळीवारासह पाऊस पडेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.