मनमाड, 18 सप्टेंबर : पुरात वाहून गेलेल्या कारमधून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन दलाल यश आलं आहे. तब्बल दोन दिवसानंतर मृतदेह लागला हाती आहे. बबलू कौरणी असं या तरुणाचे नाव असून बुधवारी रात्री नांदगावच्या हिसवळ येथे पुराच्या पाण्यात कार वाहून गेली होती. त्यात असलेल्या दोन पैकी एकाचा जीव वाचला होता तर दुसरा तरुण वाहून गेला होता.
गेल्या काही दिवसापासून मनमाड, नांदगाव परिसरात जोरदार पाऊस होत असून बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हिसवळ परिसराच्या जवळ असलेल्या एका ओढ्याला पूर येऊन त्याचे पाणी पुलावरून वाहत होते. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. एक डंपर पुराच्या पाण्यातून जात असल्याचे पाहून कार चालकाने त्याच्या मागे गाडी नेली.
मात्र पुराच्या पाण्याचा वेग जास्त होता. त्यामुळे कार पाण्यात वाहून गेली. अनेक जण कार चालकाला गाडी पाण्यात घालू नको, असे सांगत असताना देखील त्याने धाडस करून कार पुलावरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे हे धाडस जीवावर बेतले आणि कार वाहून गेली. कारमध्ये बापू आहेर आणि त्याचा मित्र बबलू कौरणी हे दोघे होते.
सुमारे 200 फुटावर जाऊन कार एका झाडाला अडकल्यानंतर आहेर याला पोहोता येत होते, त्यामुळे तो पुराच्या पाण्यातून बाहेर पडला. मात्र कौरणी हा वाहून गेला होता. अग्निशमन दलाचे जवान गुरुवारपासून त्याचा शोध घेत होते. अखेर आज सायंकाळी त्याचा मृतदेह हाती लागला आहे.