भाजप म्हणाले शिवसेनेला, 'किमान आजतरी आमच्याशी भांडू नका'

भाजप म्हणाले शिवसेनेला, 'किमान आजतरी आमच्याशी भांडू नका'

युतीत तणाव निर्माण झालेला असताना किमान मकर संक्रांतीच्या दिवशी दोन्ही पक्षांमध्ये गोडवा निर्माण झाला.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 15 जानेवारी : कोणत्या ना कोणत्या विषयावरून रोज भांडणा-या भाजप शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आज मंगळवारी मकर संक्रांतीच्या  निमित्ताने गोडवा निर्माण झालेला पाहायला मिळाला. आणि ठिकाणही महत्त्वाचं होतं, मंत्रीमंडळ बैठकीचं. आज मकर संक्रांतीनिमित्त मंत्रीमंडळ बैठकीत भाजपकडून शिवसेनेला तिळगूळ देण्यात आला. राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना तिळगूळ देत किमान आज तरी भांडण करू नका अशी मिश्किल विनंती केली.

त्यावर कदम यांनीही आजच्या दिवशी तरी भांडणार नाही अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली. गेली ५ वर्षं भाजप आणि शिवसेनेत  वाद सुरू आहेत. या वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युती होणार की नाही या विषयावरुन युतीत तणाव निर्माण झालेला असताना किमान आजच्या दिवशी दोन्ही पक्षांमध्ये गोडवा निर्माण झालाय.

मंत्रिमंडळ बैठकीतले निर्णय

मंगळवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत तब्बल 700 कोटींच्या विविध योजनांना मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. यात ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजासाठी  विविध योजनांचा समावेश आहे. समाजातल्या विविध घटकांना खूष करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या आधी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला.

त्यानंतर केंद्राने खुल्या गटातल्या गरीब लोकांना 10 टक्के आरक्षण दिलं. त्यामुळे ओबीसी नाराज झाल्याचं लक्षात आल्याने आता ओबीसींसाठी नव्या योजनांना मंजूरी दिली. मंत्रिमंडळाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना आणि केंद्राची पंतप्रधान आरोग्य विमा योजना राज्यात एकत्रितपणे राबविली जाणार आहे.

यात रुग्णांना ५ लाखांपर्यंत नि:शुल्क उपचार मिळणार मिळणार आहेत. यात आधीपेक्षा जास्त आजारांचा समावेश करण्यात आलाय.

 महत्त्वाचे निर्णय

ओबीसी आणि भटक्या विमुक्त समाजासाठी ७०० कोटींच्या योजनांचा प्रस्ताव मंजूर

ओबीसी महामंडळाला २५० कोटींची मदत

भटक्या -विमुक्त महामंडळाला  300 कोटी

तर पहिल्यांदाच वडार आणि रामोशी समाजासाठी विशेष पॅकेज

First published: January 15, 2019, 4:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading