मुंबई, 23 मे : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाल्यामुळे हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या मनोहर जोशी यांच्या मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. हिंदुजा हॅास्पिटलमधील डॅाक्टरांनी पुढील 24 तास मनोहर जोशी यांच्या तब्येतीसाठी महत्त्वाचे असल्याचं म्हटलं आहे. मनोहर जोशी यांना सोमवारी रात्री अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
उद्धव ठाकरे रुग्णालयात
दरम्यान त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह रुग्णालयात पोहोचले आहेत. मनोहर जोशी यांचं वय 86 वर्षे इतकं असून शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मुंबईचं महापौरपदही त्यांनी 1976 ते 1977 या काळात भूषवलं होतं. तर शिवसेना भाजप युतीच्या सरकारमध्ये ते मुख्यमंत्री बनले होते.
मनोहर जोशी हे मूळ बीडचे असून त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्ह्यातल्या नांदवी गावात झाला. शिक्षणानिमित्त मनोहर जोशी हे मुंबईत स्थलांतरीत झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई महानगरपालिकेत अधिकारी म्हणूनही नोकरी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.