राहुल पाटील, प्रतिनिधी
पालघर, 30 नोव्हेंबर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवरी येथे भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. ब्रिझा कार आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुर्दैवाने तिन्ही मृत एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे. मालवाहू ट्रक आणि ब्रिझा कार मध्ये धानिवरी येथे हा भीषण अपघात झाला.
या अपघातात दीपक अग्रवाल, सुमित्रा अग्रवाल, सत्यनारायण अग्रवाल अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. तर केतन अग्रवाल हा जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. समोरील वाहनाचा अंदाज न आल्याने भरधाव ब्रीझा कारणे मालवाहू ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर काही वेळातच जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
हेही वाचा - सेनेच्या 'वंचित फॅक्टर'ला शिंदे देणार जशास तसे उत्तर, मोठा नेता लागला गळाला
मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आजही भूकंपप्रवण क्षेत्र कायम असून टोल वसूल केल्या जाणाऱ्या कंपनीकडून वेळेत रुग्णवाहिका पोहचत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे टोल वसूल करणाऱ्या कंपनीने फक्त टोल वसूल न करता महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या ठिकाणी तातडीने मदत पोहोचवावी, अशी मागणी स्थानिक आणि प्रवाशांकडून केली जात आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Major accident, Road accident