पुणे, 14 फेब्रुवारी : शिक्षणाचं माहेर घरं म्हणून ओळख असलेलं पुणे आता खरंच शिक्षणाचं माहेर घर आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठातील पत्रकारिता विभागात संघाचे लेक्चर ठेवण्याचा वाद ताजा असतानाच आणखी एका नामांकित महाविद्यापीठात चक्क महायज्ञ भरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या महायज्ञाला औरंगाबाद दौऱ्यावर जाण्याआधी हजेरी लावली होती.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर धर्मसंस्कार टाकण्यासाठी पुण्यातील नामांकीत अशा विद्यापीठात चक्क अति महारुद्र यज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. 'द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी' अशी ओळख असलेल्या पुण्यातील लोहगाव स्थित असलेल्या अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठात हा प्रकार सुरू आहे. 11 फेब्रुवारीपासून आयोजित केलेला हा महायज्ञ 22 फेब्रुवारीपर्यंत विद्यापीठ कॅम्पसमध्येच सुरू राहणार आहे.
पर्यावरणाच रक्षण, पर्यावरणाचं शुद्धीकरण करणे त्याच बरोबर विद्यार्थी आणि वैदिक शास्त्र या दोघांचा मेळ घालण्याच्या उद्धेशाने हा यज्ञ करत असल्याचं सांगत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर यांनी या महायज्ञाचं समर्थन केलं आहे.
दरम्यान, विद्यापीठ परिसरात अशा प्रकारांमुळे पुण्यातील बहुतांश महाविद्यालय आधीच चर्चेत आहेत. त्यात अजिंक्य पाटील विद्यापीठाने भर घातली असंच म्हणावं लागेल. विशेष म्हणजे, मनसे प्रमुख राज ठाकरे ह्यांनी सुद्धा या महा यज्ञाला भेट दिल्याने त्यांच्याही भेटीवर चर्चा रंगली आहे.
दोनच दिवसांपूर्वी, साविञीबाई फुले विद्यापीठाचं "संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागा"अर्थात रानडे इनस्टिट्यूट पुन्हा वादात सापडलंय. RSS ची विचारधारा समजून घेण्याच्या नावाखाली इथल्या विद्यार्थ्यांना मोती बागेत जाऊन संघप्रचारकांचे लेक्चर अटेंड करण्याची अधिकृत नोटीस काढण्यात आली होती. पण आंबेडकरी आणि डाव्या विद्यार्थी संघटनांनी आक्षेप घेताच हे लेक्चरच रद्द करण्यात आले आहे. पण तरीही काही विद्यार्थी संघटनांनी रानडे इनस्टिट्यूटमध्ये जाऊन आंदोलन करत निषेध नोंदवला. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील झाल्या प्रकाराचा निषेध नोंदवला होता.
दरम्यान, "संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागा"कडून या प्रकाराबद्दल खुलासा करण्यात आला आहे. MJMC हा अभ्यासक्रम चालवला जातो. त्याअंतर्गत "वर्ल्ड व्ह्यू" हा विषय शिकवला जातो. विद्यार्थ्यांना विविध विचारप्रवाहांची माहिती व्हावी आणि त्यांना सभोवतालचे योग्यप्रकारे आकलन व्हावे, हा हेतूने विविध संघटनांची ओळख करून दिली जाते. या विषयात सर्वच विचारधारा आणि संघटनाच्या परिचयाचा समावेश आहे. ही लेक्चर विविध ठिकाणी आयोजित केली जातात. त्याचाच भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी "knowing RSS" या लेक्चरचे शनिवारसाठी नियोजन करण्यात आले होते. ते शनिवार पेठेत मोतीबाग येथे होणार होते.
मात्र, या लेक्चरला काही संघटनांनी विरोध दर्शवल्याने शनिवारचे हे लेक्चर रद्द करण्यात आले आहे. यापुढे विविध संघटनांची माहिती देणारी लेक्चर्स विभागातच होतील, असा निर्णय विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आला आहे.